पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये अकरावी प्रवेशाच्या पाच फेऱ्या घेऊनही अद्याप प्रवेशाचा घोळ संपलेलाच नाही. अजूनही प्रवेशाबाबत पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा पाढाही संपलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रवेशाची सहावी फेरी घेण्याचा निर्णय प्रवेश समितीने घेतला आहे.
गेले दोन महिने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. महाविद्यालये कागदोपत्री सुरू होऊनही १५ दिवस झाले. प्रवेश प्रक्रियेच्या पाच फेऱ्या झाल्या मात्र अद्यापही प्रवेश प्रक्रियेबाबतच्या तक्रारी कमी झालेल्या नाहीत. लांबचे महाविद्यालय मिळाले, दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा असूनही ते मिळाले नाही, कट ऑफमध्ये बसत असतानाही महाविद्यालय मिळाले नाही, महाविद्यालयाचे शुल्क जास्त आहे, विनाअनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला आहे, मिळालेल्या महाविद्यालयात हवे ते विषय नाहीत, पुरेशा सुविधा नाहीत अशा तक्रारी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात येत आहेत. सध्या प्रवेश समितीकडे विज्ञान, वाणिज्य आणि कला अशा तीनही शाखांचे मिळून साधारण २ हजार अर्ज जमा झाले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत तक्रारी आहेत, त्यांच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचे अर्ज जमा झाल्यानंतर त्याची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर ‘टेबल अॅडमिशन’ करण्यात येणार आहेत. म्हणजेच गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना बोलावून त्यांना रिक्त जागांचे तपशील दाखवण्यात येतील आणि दाखवलेल्या महाविद्यालयापैकी एका महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी लगेच प्रवेश निश्चित करायचा आहे. या प्रवेश फेरीचे अर्ज सध्या गरवारे महाविद्यालयात वितरित करण्यात येत असून मंगळवारी सायंकाळपर्यंत (४ ऑगस्ट) हे अर्ज देण्यात येणार आहेत. ६ ऑगस्टला गुणवत्ता यादी जाहीर होईल आणि ७ ऑगस्टला प्रवेश प्रक्रिया होईल. फग्र्युसन महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय आणि सप महाविद्यालयात ही प्रवेश फेरी राबवण्यात येणार आहे. त्याचे तपशील जाहीर करण्यात येतील, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिली.

निर्णय होण्याआधीच समितीकडे अर्जही तयार
पाचव्या फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच आणि सहावी फेरी घेण्याचा निर्णय निश्चित करण्यापूर्वीच प्रवेश समितीकडे या फेरीचे अर्ज छापून तयारही होते. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत गोंधळ होणारच आहे याची कल्पना प्रवेश समितीला होती का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

संघटना आणि दलाल खुश
‘प्रवेश घेऊ नका.. पुढची फेरी आपल्याला हवी तशी होईल,’ ‘महाविद्यालय बदलून मिळेल’, असे सल्ले विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि प्रवेश करणाऱ्या दलालांकडून पालकांना दिले जात आहेत. त्यामुळे पाचव्या फेरीत प्रवेश मिळूनही तो न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी दिसत आहे. त्यातच आता सहावी फेरी समुपदेशनाची असल्यामुळे या फेरीत हवी ती महाविद्यालये मिळवण्यासाठी पालकांनी संघटनांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले आहेत. ‘जवळचे महाविद्यालय’ म्हणजे नेमके किती अंतरावरचे हे स्पष्ट नसल्यामुळे प्रतिष्ठित महाविद्यालयेच सर्वाना जवळची वाटत आहेत. त्यामुळे या प्रवेश फेरीत दलालांचे फावणार असल्याचे दिसत आहे.

पाचव्या फेरीचे कट ऑफ पहिल्या फेरीपेक्षा जास्त
पाचव्या प्रवेश फेरीत प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात आले. त्यामध्ये चांगले गुण असलेलेही अनेक विद्यार्थी होते. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये पाचव्या फेरीचे कट ऑफ गुण हे पहिल्या फेरीपेक्षाही जास्त दिसत आहेत. पहिल्या फेरीपासून चौथ्या फेरीपर्यंत कमी होत आलेले कट ऑफ गुण पाचव्या फेरीत मात्र तब्बल ५ ते ६ सहा टक्क्य़ांनी वाढल्याचे दिसत आहे.

वरिष्ठांची आगपाखड
अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच व्हावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मुंबईमध्ये ऑफलाईन प्रवेश दिल्यामुळे न्यायालयाने शिक्षण विभागाला धारेवर धरले होते. पुण्यात ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे, तर मुंबईत का होऊ शकत नाही, असा प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केला होता. मात्र, त्यावर शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र पुण्याच्या प्रवेश समितीवरच आगपाखड केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाच फेऱ्या ऑनलाईन पद्धतीने का करण्यात आल्या, मुंबईप्रमाणेच तिसऱ्या फेरीनंतरच समुपदेशन फेरी का राबवण्यात आली नाही, असा प्रश्न प्रवेश समितीला वरिष्ठांकडून करण्यात आला आहे.