पुण्यातील ससून रूग्णालयात मेस्मा कायदा लागू करण्यात आला आहे. मेस्मा लागू झालेले ससून हे राज्यातील पहिलेच रुग्णालय ठरले आहे. हा कायदा लागू झाल्यामुळे आता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिने अत्यावश्यक सेवा बंद ठेवता येणार नाहीत. म्हणजेच यापुढील काळात रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना कुठल्याच प्रकारचा संप पुकारता येणार नाही. काही दिवसांपूर्वी इथल्या परिचारिकांनी बदलीच्या विरोधात संप पुकारला होता. त्यानंतर झालेल्या वाटाघाटीनंतर हा संप मागे घेण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर हा सरकारने हा कायदा लागू केला असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, शासनाचा हा निर्णय म्हणजे कर्मचारी संघटनांच्या अधिकारांची मुस्कटदाबी असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या निर्णयावर कर्मचारी किंवा कामगार संघटना काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

मेस्मा म्हणजे काय

महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११ म्हणजे मेस्मा होय. रुग्णालये व दवाखाने यांसह सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता राखण्याच्या संबंधातील सेवा अत्यावश्यक आहेत. किरकोळ व घाऊक औषधविक्री सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. या कायद्यानुसार लोकहित लक्षात घेऊन संपास मनाई करण्यात येते. आदेश झुगारणाऱ्यांवर कारवाई होते. प्रामुख्याने रुग्णालये व दवाखाने यांच्यासह सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता राखण्याच्या संबंधातील सेवा अत्यावश्यक आहेत.