अभिमत विद्यापीठांच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेवरून अद्यापही गोंधळ कायम असून एमबीबीएस, बीडीएस हे अभ्यासक्रम वगळता इतर बीएएमएस, वैद्यकीय पूरक क्षेत्रासाठीच्या अभ्यासक्रमांसाठी या विद्यापीठांनी आपली सामाईक परीक्षा कायम ठेवली आहे. कर्नाटकमधील एका विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेदरम्यान पुण्यात शनिवारी गोंधळ झाला.

अभिमत विद्यापीठांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश घेण्यासाठी ‘नीट’ लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता विद्यार्थी आणि विद्यापीठेही गोंधळात आहेत. एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रम वगळता बीएएमएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी, नर्सिग अशा अभ्यासक्रमांसाठी अभिमत विद्यापीठांनी सीईटी कायम ठेवली आहे.

‘कर्नाटक लिंगायत एज्युकेशन युनिव्हर्सिटी (केएलईयू) या अभिमत विद्यापीठाची सामाईक प्रवेश परीक्षा शनिवारी होती. या परीक्षेसाठी एमबीबीएस, बीडीएस या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मनाई करण्यात आली. त्यावर पालक आणि विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्यावर या परीक्षेला बसण्याची परवानगी विद्यार्थ्यांना देण्यात आली. परीक्षेदरम्यान ‘एमबीबीएस, बीडीएस’ या अभ्यासक्रमांसाठी आम्ही परीक्षा देत नाही, असे हमीपत्र विद्यार्थ्यांकडून लिहून घेण्यात आले.

त्यावर पालकांनी आक्षेप घेतल्यामुळे परीक्षा केंद्रावर काही काळ गोंधळ निर्माण झाला.