येत्या २३ एप्रिलच्या (गुरुवारी) पहाटे भारतीय प्रमाणवेळेनुसार ५.३० वाजता वीणा (लिरा) तारकासमूहातून मोठय़ा प्रमाणात उल्कावर्षांव होणार असून तो पुण्यातूनही ईशान्य दिशेला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रकाश व हवेचे प्रदूषण नसलेल्या ठिकाणी जावे  लागेल. अनुभवी व्यक्तीची मदत घेतल्यास हा वर्षांव चांगल्या प्रकारे पाहता येईल, अशी माहिती नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिली.
आकाशाच्या कुठल्याही दिशेने साधारण पाच मिनिटाला एक उल्का येताना दिसेल. जर आकाश पूर्ण काळे असेल तर उल्कावर्षांवाचा वेग १८ ते ९० उल्का इतका राहील, पण त्यासाठी चंद्रप्रकाश असता कामा नये. उल्कावर्षांवाचा अनुभव नसेल व आकाशाची स्थिती आदर्श नसेल, अनुभवी व्यक्तीची मदत घ्यावी. उल्कावर्षांव पाहण्यासाठी शहरापासून दूर जाऊन ईशान्येकडील (उत्तर-पूर्व) क्षितिजाकडे पाहावे. प्रकाशाचे प्रदूषण किंवा कृत्रिम प्रकाश असणार नाही असे ठिकाण निवडावे. गडद काळोख असेल तरच उल्का चांगल्या दिसतात, असेही त्यांनी सांगितले.