राज्यभर मोसमी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज; मुंबईसह कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रात मुसळधारांचा इशारा

पुणे : हवामान खात्याच्या अंदाजानंतरही गेल्या दोन आठवडय़ांपासून ओढ देणारा मोसमी पाऊस येत्या तीन-चार दिवसांत जोरात बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या सहा ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबई, ठाण्यासह कोकण तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. खालावलेला पाणीसाठा आणि खोळंबलेली शेतीकामे यांमुळे चिंताग्रस्त झालेल्या जनतेसाठी ही नवी तारीख नवी आशा घेऊन आली आहे.

गेल्या दोन आठवडय़ांपासून मराठवाडा वगळता कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पाणीसाठय़ांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई शहरात पाणीकपात जाहीर करण्यात आली असून, पुण्यातही धरणसाठा पाहता पाणीकपातीची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. ग्रामीण भागात शेतीच्या दृष्टीनेही पावसाची चिंता वाढत आहे. अशात पावसाबाबत अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. समुद्र आणि पश्चिम किनारपट्टीवर मोसमी वाऱ्यांचे प्रवाह मजबूत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३ ते ६ ऑगस्टच्या कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात जोरदार पावसाची शक्यता असून, विदर्भातही पावसाची हजेरी राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.  या कालावधीत मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड जिल्ह्याच्या काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक  या जिल्ह्यांतही  मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

जलसाठय़ाची चिंता : वेळेत येऊनही पावसाने पाठ फिरवल्याने राज्यभरातील धरणांतील जलसाठा चिंता वाढवू लागला आहे. धरणांतील पाणीसाठय़ाचा रविवारी आढावा घेतला असता, गतवर्षीच्या तुलनेत (४२.३७ टक्के) यंदा साठा (३९.१५) तीन टक्क्य़ांनी कमी आहे.  विशेष म्हणजे, कोरडे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद विभागात मात्र, गतवर्षीच्या तुलनेत (३.२४ टक्के) यंदा ३७.५८ टक्के जलसाठा नोंदवण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभागांतही जलसाठय़ाची स्थिती गतवर्षीच्या तुलनेत चांगली आहे.