04 March 2021

News Flash

मेट्रोचे नवे आठ मार्ग प्रस्तावित

शहरात महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मेट्रो मार्गिकांचे काम सध्या सुरू आहे.

(संग्रहित छायाचित्र)

शिवाजीनगर-हिंजवडी मार्गाचे विस्तारीकरणही प्रस्तावित; दोन टप्प्यांत जाळे विस्तारणार

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलमेंट अ‍ॅथॉरिटी- पीएमआरडीए) तयार केलेल्या र्सवकष वाहतूक आराखडय़ात (कॉम्प्रिहेन्सिव मोबिलिटी प्लॅन- सीएमपी) शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गिकेबरोबरच नव्याने आठ मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. शिवाजीनगर-हिंजवडी मार्गाचे विस्तारीकरणही प्रस्तावित असून दोन टप्प्यात मेट्रो मार्गिकेचे जाळे उभारण्याचे नियोजन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून पहिल्या टप्प्यातील दोन मार्गाचे काम सुरू असून या मार्गाच्या विस्तारीकरणाबरोबरच नव्याने काही मार्ग मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच पीएमआरडीएकडूनही मेट्रोचे आठ मार्ग प्रस्तावित असल्यामुळे भविष्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे मोठे जाळे निर्माण होणार असून प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.

शहरात महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मेट्रो मार्गिकांचे काम सध्या सुरू आहे. पीएमआरडीएची स्थापना झाल्यानंतर शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. त्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. पीएमआरडीएच्या मेट्रो मार्गिकेची प्रक्रिया सुरू असतानाच आठ नवे मार्ग भविष्यात करण्यात येतील, असे पीएमआरडीएकडून जाहीर करण्यात आले होते.

या प्रस्तावित मार्गाची पूर्व व्यवहार्यता (प्री फिजिबिलीटी रिपोर्ट) तपासण्याचे काम पीएमआरडीएकडून दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (डीएमआरसी) देण्यात आले होते. त्यासाठी अंदाजपत्रकामध्ये पंधरा कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. मात्र पीएमआरडीने प्रथम र्सवकष वाहतूक आराखडा (सीएमपी) तयार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार आराखडा करण्याचे काम एल अ‍ॅण्ड टी या कंपनीला देण्यात आले होते.

पीएमारडीएच्या सात हजार २०० चौरस किलोमीटर लांबीच्या हद्दीचा हा आराखडा प्रस्तावित आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील दोन हजार चौरस किलोमीटर लांबीच्या परिसरातील वाहतुकीचा आराखडा एल अ‍ॅण्ड टी कंपनीकडून करण्यात आला आहे.

हा आराखडा पीएमआरडीएला सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये वाहतूक सुधारणेला प्राधान्य देण्यात आले असून ६६ हजार कोटी रुपयांचे काही प्रकल्प प्रस्तावित असून मेट्रोचे मार्ग आणि शिवाजीनगर-हिंजवडी मार्गाच्या विस्तारीकरणावर भर देण्यात आला आहे. पुढील वीस वर्षांमध्ये हे मार्ग उभारण्याचे नियोजन आहे.

अनेक मार्गाचे विस्तारीकरण

महामेट्रोकडून सध्या वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मेट्रो मार्गिकांची कामे सुरू आहेत. त्यापैकी वनाज ते रामवाडी या मेट्रोमार्गिकेचे वनाजच्या बाजूला चांदणी चौकापर्यंत तर रामवाडीच्या बाजूला वाघोलीपर्यंत विस्तारीकरणास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग स्वारगेटच्या बाजूला कात्रजपर्यंत विस्तारित होणार आहे. तर पिंपरी-चिंचवडच्या बाजूलाही निगडीपर्यंत विस्तारीकरण होणार आहे. याशिवाय खडकवासाला ते स्वारगेट, शिवणे ते चांदणी चौक अशा मार्गाचे प्रस्ताव असून त्यावर येत्या काही दिवसांत निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे भविष्यात महामेट्रो आणि पीएमआरडीएला योग्य नियोजन करून मेट्रोचे जाळे विस्तारावे लागणार आहे.

मेट्रोचे प्रस्तावित मार्ग

* निगडी ते कात्रज

*  चांदणी चौक ते वाघोली

*  हिंजवडी ते शिवाजीनगर

*  हिंजवडी ते चाकण

*  सिंहगड रस्ता ते पुणे कॅन्टोन्मेंट

*  स्वारगेट ते वारजे

*  वाघोली ते हिंजवडी

*  चांदणी चौक ते हिंजवडी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 1:03 am

Web Title: metro eight new routes proposed
Next Stories
1 लोकजागर : पाण्याचे पाप
2 पुणेकरांच्या फोनवर आजपासून गुगल ‘नेबरली’चा स्मार्ट शेजार
3 ‘अप्रकाशित पु. ल.’चे शुक्रवारी प्रकाशन
Just Now!
X