संत तुकारामनगर ते फुगेवाडीपर्यंतच्या टप्प्यातही चाचणी

पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) करण्यात येणाऱ्या वनाज ते रामवाडी या मार्गातील आनंदनगर ते आबासाहेब गरवारे महाविद्यालयापर्यंत, तर पिंपरी ते स्वारगेट या दुसऱ्या मार्गावरील संत तुकारामनगर ते फुगेवाडीपर्यंतच्या मेट्रोचे काम येत्या मार्चअखेपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर लगेच या मार्गावर मेट्रो रेल्वेची चाचणी सुरू होणार आहे.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी ही माहिती दिली. या दोन मार्गाबरोबरच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात येणाऱ्या शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गासाठी भूसंपादनाचे काम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे हे तिन्ही मार्ग मार्च २०२२ पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होतील. तत्पूर्वी, येत्या मार्चअखेपर्यंत दोन मार्गावर मेट्रो सुरू होणार आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.

या दोन मार्गाचे विस्तारीकरण करण्याची मागणी आहे. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दोन मार्गिकांबरोबरच शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गिकेसाठी भूसंपादनाचे काम सुरू असून हे तिन्ही मार्ग मार्च २०२२ पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होतील. केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर येत्या पाच वर्षांत १०३ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. पुण्यातील वाहतुकीच्या आढाव्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे, अशीही माहिती जावडेकर यांनी दिली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि अमर साबळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पालिका आयुक्त शेखर गायकवाड, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व आमदार सिद्धार्थ शिरोळे या वेळी उपस्थित होते.

जायका प्रकल्पासाठी केंद्र, राज्य सरकारच्या बैठका

मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पाचे (जायका) काम रखडले आहे. आता हे काम वेगाने करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या स्वतंत्र बैठका घेतल्या जाणार आहेत. गेली तीन वर्षे माझ्याकडे या खात्याचे मंत्रिपद नव्हते. आता हा प्रकल्प मार्गी लावला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून मार्च २०१६ पर्यंत प्रकल्प सल्लागार नियुक्त करणे प्रस्तावित होते. पेल फ्रिशमन आणि अन्य प्रकल्प सल्लागारांची १६ जानेवारी २०१८ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्प अहवालानुसार एप्रिल २०२१ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे प्रस्तावित होते. मात्र, सल्लागारांच्या नियुक्तीनुसार जुलै २०२३ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून या वेळी सांगण्यात आल्याचेही केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी स्पष्ट केले.