मित्रमंडळींच्या टोळक्यांकडून मध्यरात्री भर रस्त्यात किंवा चौकांमध्ये वाढदिवस साजरा करण्याचे नवे फॅड शहरात सुरू झाले असून या टोळक्यांच्या रात्रीच्या उपद्रवामुळे सर्वसामान्यांना मात्र वेठीला धरले जात आहेत. हे वाढदिवस मध्यरात्री बारा वाजता चौकांमध्ये सुरू होतात आणि त्या वेळी फटाकेही मोठय़ा प्रमाणात वाजवले जातात.
वाढदिवसाच्या साजरे करणाऱ्या टोळक्यांचा उपद्रव शहराच्या सर्वच भागात वाढला आहे. रोज रात्री वेगवेगळ्या भागात कोणत्या ना कोणत्या चौकांमध्ये वाढदिवस साजरे होत असतात. परिसरातील कथित भाई, भाऊ, अण्णा, अप्पा, दादा आदींच्या कंपूमध्ये वावरणाऱ्यांचे हे वाढदिवस रस्त्यावर अगदी खुलेपणाने साजरे होतात. या वाढदिवसांच्या आवाजाचा दणका सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. वाढदिवस साजरा करताना कारमधील टेपवर दणदणाटात गाणीही लावली जातात. या उपद्रवी मंडळीच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिक त्यांच्या विरोधात तक्रार देखील करण्यास धजावत नाहीत. शहरात दररोज रात्री वाढदिवसाच्या नावाखाली थेट कायदा सुव्यवस्थेला आव्हान देण्याच्या घटना घडत असून अशा घटना कोण रोखणार, असा प्रश्न सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे.
वाढदिवस साजरा करण्याच्या प्रथेला धार्मिक अधिष्ठान आहे. ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन तसेच औक्षण करून वाढदिवस साजरे केले जातात. मात्र, शहरात तरुणांचे वाढदिवस त्यांच्या मित्रमंडळींकडून रस्त्यावरच साजरे करण्याच्या गैरप्रथेने जोर धरला आहे. चौकाचौकातील कथित नेत्यांचेही वाढदिवस अशाप्रकारे मध्यरात्री साजरे होऊ लागले आहेत. रात्री बाराच्या ठोक्याला फटाक्यांचा दणदणाट, ध्वनिवर्धकाचा कर्णकर्कश आवाज, मद्यधुंद कार्यकर्त्यांकडून नेत्याचे अभीष्टचिंतन, चौकातच केक कापणे आदींमुळे मध्यरात्री सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे प्रकार सर्वच भागात वाढले आहेत.
एखाद्या नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाकडे (कंट्रोल रूम) अशा प्रकाराद्दल तक्रार केल्यास रात्रपाळीत गस्त घालणारे पोलिस कर्मचारी अशा टोळक्याला समज देऊन रवाना होतात. मात्र पोलीस गेले की कार्यकर्त्यांना आणखीनच स्फुरण येते. तक्रारदाराच्या नावाने शिवीगाळ करण्यात करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. महाविद्यालयीन तरुण यात मागे नाहीत. पुण्यात मोठय़ा संख्येने परगावांहून तसेच परराज्यातून आणि परदेशांमधून विद्यार्थी शिक्षणासाठी आले आहेत. या विद्यार्थ्यांकडूनही रात्री-अपरात्री होणारे वाढदिवस हे सोसायटय़ांमधील रहिवाशांच्या दृष्टीने त्रासदायक ठरत आहेत. सोसायटय़ांच्या आवारात किंवा सोसायटय़ांच्या पार्किंगमध्ये या विद्यार्थ्यांच्या बर्थ डे पाटर्य़ा रंगतात. त्यामुळे सर्वच रहिवाशांना त्रास होतो. मात्र या गैरप्रकाराबाबत कोणाकडेही तक्रार करता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
वाढदिवसाची मजल…
रस्त्यावर वाढदिवस साजरे करणाऱ्यांना कशाचेच भान राहिलेले नाही. गेल्या आठवडय़ात बिबवेवाडीत रस्त्यावर वाढदिवस करणाऱ्या टोळक्याला समज देणाऱ्या एका पोलिस हवालदाराच्या अंगावर वाढदिवसाचा केक फेकून मारण्याची घटना घडली होती. हा प्रकार करून तरुण पसार झाले होते. मात्र नंतर पसार झालेल्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली होती.