राजस्थानमधील जोधपूरच्या एअर फोर्स स्टेशनवर आलेले निवृत्त विंग कमांडर विजय जोशी शुक्रवारी भावूक झाले होते. त्यांच्या मनात अनेक आठवणी दाटून आल्या होत्या. ३५ वर्षांपूर्वी जे विमान हाताळले, त्याच विमानाला निरोप देण्याच्या कार्यक्रमाला ते आले होते. त्यामुळे त्यांचे भावनिक होणे स्वाभाविक आहे. आपण एखादी गाडी विकत घेतल्यानंतर, त्या गाडीबरोबर आपले भावनिक नाते तयार होते. वैमानिकांचे सुद्धा तसेच असते. मिग-२७ मधून उड्डाण करणारे विजय जोशी हे इंडियन एअर फोर्सचे पहिले फायटर पायलट आहेत.

मिग-२७ बरोबर काय आहे नाते ?
३५ वर्षांपूर्वी १९८४ सालच्या डिसेंबर महिन्यात रशियन बनावटीचे मिग-२७ विमान इंडियन एअर फोर्सकडे सुपूर्द करण्यात आले. त्यावेळी टेस्ट पायलट म्हणून विंग कमांडर विजय जोशी यांनी सर्वप्रथम मिग-२७ मधून उड्डाण केले होते. शुक्रवारी राजस्थानच्या जोधपूर बेसवर तैनात असणारी मिग-२७ फायटर विमानांची शेवटची तुकडी निवृत्त झाली. त्यावेळी निरोपाच्या कार्यक्रमाला जोशी सुद्धा तिथे हजर होते.

काय म्हणाले विजय जोशी
‘मिग-२७’ म्हणजे एक नशा आहे या शब्दात विजय जोशी यांनी या विमानाचे वर्णन केले. मिग-२७ च्या निवृत्तीने एक युग समाप्त होत आहे. मिग-२१ वरुन मिग-२७ कडे वळणे हे एक मोठे पाऊल होते आणि त्यापुढे जायचे आहे. मिग-२७ ची निवृत्ती पाहून मला खूप वाईट वाटतेय पण त्याशिवाय काही पर्याय नाही असे जोशी म्हणाले.

आजच्या दिवस माझ्यासाठी भावनिकतेने भरलेला आहे. मी आज मिग-२७ ला अखेरचे पाहतोय याचे मला समाधान आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजतो, कारण मला मिग-२७ च्या समावेशाचा आणि निवृत्तीचा सोहळा पाहता येतोय असे जोशी यांनी सांगितले. १९६३ साली हवाई दलात रुजू झालेल्या विजय जोशी यांनी सुखोई-७, मिग-२१ या फायटर विमानांमधूनही उड्डाण केले आहे.