औंध येथील मेडीपॉईंट रुग्णालयाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नीतूकुमारी सुरेंद्रसिंग शोरान (वय २४, रा. मेगापॉलीस सोसायटी, हिंजवडी) असे उपचारादरम्यान मरण पावलेल्या तरुणीचे नाव आहे. यासंदर्भात मेजर सुरेंद्रसिंग शोरान (वय ५२) यांनी चतु:शंृगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. नीतूकुमारी तिच्या मित्रासोबत दुचाकीवरून निघाली होती. औंध येथील मेडीपॉईंट रुग्णालयानजीक भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये सहप्रवासी नीतूकुमारी गंभीर जखमी झाली होती.

दहा दिवसांपूर्वी ही दुर्घटना घडली होती. गंभीर जखमी झालेल्या नीतूकुमारीचा बुधवारी ( ७ सप्टेंबर) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तिच्या मित्रावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नीतूकुमारीचे वडील लष्करी अधिकारी आहेत. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अद्याप वाहनचालकाचा शोध लागलेला नाही. सहाय्यक निरीक्षक पी.टी.भोगम तपास करत आहेत.