राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेच्या ६५० विद्यार्थिनी प्रतिसादाच्या प्रतीक्षेत

‘सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसारख्या संस्थांमध्ये लष्करी प्रशिक्षणाची संधी मिळते. मात्र, मुलींसाठी अशी कोणतीही सुविधा नाही. आम्हालाही देशसेवा करण्याची इच्छा असून, शालेय शिक्षणानंतर लष्करी प्रशिक्षणाची संधी मिळावी,’ अशी भावना व्यक्त करत ६५० विद्यार्थिनींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. या विद्यार्थिनींनी पंतप्रधानांना पत्रे पाठवली असून अद्याप त्यांना पंतप्रधानांकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची मुळशी जवळील कासार आंबोली येथे राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा आहे. राज्यातील ही पहिली मुलींची सैनिकी शाळा ठरली. ही शाळा १९९७ मध्ये सुरू झाली. या शाळेत विद्यार्थिनींच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. विद्यार्थिनींना नियमित अभ्यासक्रमासह सैनिकी प्रशिक्षण दिले जाते. मात्र, पुढे लष्करी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही. परिणामी, त्यांना नियमित पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या सैनिकी शिक्षणाचा त्यांना तसा काही फायदा होत नाही.

त्यामुळे या शाळेच्या विद्यार्थिनींनी थेट पंतप्रधानांना पत्र पाठवून बारावीनंतर सैन्य, नौदल, वायूदलाच्या प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ‘‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ ही आपली योजना आहे. त्याच प्रमाणे मुलींना सैन्यदलामध्ये बारावीनंतर संधी मिळावी, मुलांप्रमाणेच मुलींनाही लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळावा,’ असे विद्यार्थिनींनी पत्रात नमूद केले आहे.

‘सैनिकी शाळांतील विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्ये राखीव कोटय़ाच्या स्वरूपात संधी मिळते. तर विद्यार्थिनींना बारावीनंतर लष्करी प्रशिक्षणाची संधी मिळत नसल्याने त्यांना पारंपरिक अभ्यासक्रम, नोकरी करण्यावाचून पर्याय राहात नाही. विद्यार्थिनींना देशसेवेची इच्छा असल्याने त्यांनाही पुढील लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्ये संधी मिळण्यासाठी शाळेकडून तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, त्या बाबत पुढे काही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आता थेट पंतप्रधानांपर्यंत हा मुद्दा पत्राद्वारे पोहोचवण्यात आला आहे. त्याशिवाय अन्य संपर्क माध्यमांद्वारेही हा मुद्दा पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्राला प्रतिसाद मिळण्याची वाट पाहात आहोत,’ असे शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा विधाते यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.