टँकरमाफियांचा नवा उद्योग; प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे : टँकरमाफियांकडून महापालिकेच्या जलकेंद्रातून राजरोसपणे पाण्याची चोरी होत असतानाच शहराच्या विविध भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या साठवणूक टाक्यांमधूनही दररोज लाखो लिटर पाण्याच्या चोरीचा प्रकार होत आहे.  वडगांवशेरी येथील साठवणूक टाकीची मुख्य जलवाहिनी फोडून टँकरमाफियांकडून पाणी चोरी करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. जलकेंद्रापुरती मर्यादित असलेली पाणी चोरी आता टाक्यांतूनही होत असल्यामुळे प्रशासनाची अकार्यक्षमता स्पष्ट झाली असून पाणीचोरी करणाऱ्या टँकरमाफियांवर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखविणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहराच्या काही भागात अपुरा, अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे त्या-त्या भागातील गृहप्रकल्प, इमारती आणि सोसायटय़ांना त्यांच्या मागणीप्रमाणे महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी निविदा प्रक्रिया मागवून ठेका देण्यात येतो. मात्र टँकरमाफियांकडून पाण्याचा काळाबाजार करण्यात येतो. जलकेंद्रातील पाण्याची चोरी करून टँकरमाफियांकडून मोठमोठय़ा सोसायटय़ा, हद्दीबाहेरील आणि हद्दीतील बांधकामे, बाटलीबंद पाण्याचे व्यवसायाला हे पाणी चढय़ा दराने विकले जाते.

त्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून पाणी चोरी होत असल्याचे सातत्याने पुढे आले आहे. मात्र आता ही चोरी केवळ जलकेंद्रातून होणाऱ्या पाण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही तर पाणी विकण्यासाठी साठवणूक टाक्यांतूनही पाणी चोरी होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

वडगांवशेरी परिसरात महापालिकेची साठवणूक टाकी आहे. सुमारे १ लाख २५ हजार लीटर क्षमता असलेल्या या साठवणूक टाकीतून पाणीपुरवठा व्हावा यासाठी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनीच टँकरमाफियाकंडून फोडण्यात आली असून त्याद्वारे टँकर भरले जात असल्याचे पुढे आले आहे. दहा हजार लीटर क्षमतेचे पाण्याचे हे टँकर असून आसपासची बांधकामे, शैक्षणिक संस्था, मोठय़ा कंपन्यांना या टँकरचालकांकडून पाणीपुरवठा होत आहे.

जलकेंद्रातून होणाऱ्या पाण्याचा काळाबाजार सातत्याने पुढे आला आहे. जलकेंद्रातून चलने न काढता टँकर भरले जात असल्याच्या तक्रारीही झाल्या आहेत.

त्यानंतरही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून त्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. आताही केवळ पासधारक टँकरचालक जलकेंद्रातून पाणी घेत असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या वेळी करण्यात आला.

लेखापरीक्षण आवश्यकच

खडकवासला साखळी प्रकल्पातून महापालिका मानकापेक्षा अधिक पाणी उचलत असल्याचा दावा जलसंपदा विभाग करत आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडून हा दावा फेटाळण्यात येतो. त्यामुळे पाण्याचे लेखापरीक्षण करावे, अशी सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. मात्र लेखापरीक्षण करण्यास प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. पाण्याचा काळाबाजार, पाणीचोरी उघडकीस येण्याची शक्यता असल्यामुळेच टाळाटाळ होत आहे.जलसंपदा मंत्र्यांच्या सूचनेनुसार लेखापरीक्षण झाले असते तर या प्रकारांना आळा बसला असता. मात्र केवळ गैरप्रकार पुढे येऊ नयेत यासाठीच हा खटाटोप सुरू झाला आहे.