मंगळवारपासून ढगाळ वातावरणाची स्थिती

पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह क्षीण झाल्यामुळे राज्यातील किमान तापमानवाढ होत असतानाही पुण्याची रात्र मात्र राज्यात सर्वाधिक थंड आहे. शुक्रवारीही (१२ फेब्रुवारी) पुण्यात राज्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली. १६ फेब्रुवारीपासून शहर आणि परिसरात अंशत: ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण होणार आहे.

उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह येत असताना राज्यासह पुण्यातही या आठवडय़ात गारवा निर्माण झाला होता. शहरात तीन ते चार दिवस किमान तापमान १० अंशांखाली राहिल्याने थंडीचा कडाका वाढला होता. सध्या राज्याच्या हवामानात पुन्हा बदल होत आहेत. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह क्षीण झाले असून, बंगालच्या उपसागरातून उष्ण वारे येत असताना किमान तापमानात वाढ होत आहे. पुण्यातही ही वाढ नोंदविण्यात आली असली, तरी शुक्रवारी पुन्हा एकदा शहरात राज्यातील नीचांकी ११.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे पुण्याची रात्र राज्यात सर्वात थंड ठरली.

किमान तापमान राज्यात नीचांकी असल्याने रात्री गारवा असला, तरी निरभ्र आकाशामुळे दिवसाचे कमाल तापमान मात्र सरासरीच्या पुढे गेले आहे. त्यामुळे दुपारी उन्हाचा चटका जाणवतो. शुक्रवारी पुण्यात ३२.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार १५ फेब्रुवारीपर्यंत शहरात निरभ्र आकाशाची स्थिती राहणार आहे. सध्या मराठवाडय़ापासून विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून पुण्यातही १६ फेब्रुवारीपासून दुपारनंतर आकाश ढगाळ होणार आहे.

तापमानातील चढ-उतार

फेब्रुवारी महिन्यात पुणे शहरातील किमान तापमान तीन वेळेला राज्यातील नीचांकी तापमान ठरले. जानेवारीच्या शेवटी १६ ते १७ अंशांवर असलेले  किमान तापमान ४ फेब्रुवारीपासून कमी होण्यास सुरुवात झाली. ५ फेब्रुवारीला शहरात १२.१ अंश किमान तापमानाची नोंद झाली. दुसऱ्याच दिवशी त्यात घट होऊन ते ११.३ अंशांपर्यंत खाली आले. ७ फेब्रुवारीला १०.८ अंश, तर त्यानंतर ८ फेब्रुवारीला सुमारे महिन्यानंतर शहरातील किमान तापमान ९.६ अंशांवर आले. ९ फेब्रुवारीला थेट ८.६ अंशांवर किमान तापमान आल्याने गारव्याची तीव्रता वाढली. १० फेब्रुवारीला किंचित वाढ होऊन ते ९.२ अंशांवर पोहोचले. त्यात आता वाढ होत असून, १२ फेब्रुवारीला ११.९ अंश किमान तापमान नोंदविले गेले.