व्हॅलेंटाईन डे निमित्त अमरावतीलगतच्या चांदूर येथे असलेल्या महाविद्यालयात मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ देण्यात आली होती. त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, “मुलींना अशी शपथ द्यायला लावणं ही दुर्दैवी बाब असल्याचं राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. आदिती तटकरे पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे बोलत होत्या. यावेळी अनेक खेळाडू आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हॅलेंटाईन डे चे निमित्त साधून शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातील चांदूर या ठिकाणी महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना प्रेम, प्रेम विवाह न करण्याची शपथ शुक्रवारी देण्यात आली होती. या शपथेनंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनीही मुलींनाच अशी शपथ का दिली गेली असा प्रश्न उपस्थित केला.

राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “व्हॅलेंटाईन डे निमित्त  विद्यार्थिनींनी शपथ घेतली. ही दुर्दैवी बाब आहे की, त्या मुलींच्या मनात भीतीचं किंवा संशयाचे वातावरण निर्माण झालेले आहे ते दूर करण्याची जबाबदारी शासनाची सुद्धा आहे. शिक्षकांची, आई -वडिलांची आणि समाजाची देखील ही जबाबदारी असल्याचे त्या म्हणाल्या. विद्यार्थिनींना अशाप्रकारे शपथ दिली जाणं दुर्दैवी आहे असं आदिती तटकरे म्हणाल्या.

पुढं त्या म्हणाल्या की, एका बाजूला या गोष्टीचा आनंद आहे की त्या मुली म्हणतात आम्हाला अभ्यासावर लक्ष द्यायचं आहे. पण, दुसऱ्या बाजूला जी भीती त्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे.  ही भीती दूर होणं गरजेचं आहे असंही तटकरे यांनी म्हटलं आहे.