पुणे शहरात आठ आमदार आणि एक खासदार आणि एक मंत्री असूनही शहर आणि जिल्ह्याचा विकास होताना दिसत नाही. नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे ना आमदारांचे ना पालकमंत्र्याचे लक्ष आहे. त्यात आता पालकमंत्री गिरीश बापट यांना खासदारकीचे वेध लागले आहेत, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरीश बापट यांना चिमटा काढला.

यावेळी पवार म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश बापट अनेक ठिकाणी बैठका घेत आहेत. यातून त्यांना खासदारकीचे वेध लागल्याचे स्पष्ट होत असून त्यांना मागे लोकसभेची संधी मिळाली नाही, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० जून रोजी होणाऱ्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील आठही विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येत आहेत. आज कोथरूड विधानसभा मतदारसंघात घेण्यात आलेल्या मेळाव्यास खासदार वंदना चव्हाण, महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नगरसेवक दीपक मानकर आदी उपस्थित होते.