मोटारीतील बॅटरी चोरण्याच्या संशयावरून पुण्यातील कसबा पेठेमध्ये एका अल्पवयीन मुलाला काही नागरिकांनी पेट्रोल ओतून जाळल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. आगीमध्ये संबंधित मुलगा ६५ टक्के भाजला असून, त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सावन धर्मा राठोड (१७) असे भाजलेल्या मुलाचे नाव आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगा कसबा पेठेतील एका गाडीजवळ लघुशंका करीत असताना परिसरातील काही जणांनी संशयावरून त्याला हटकले. हा मुलगा गाडीच्या बॅटऱ्या चोरणारा असल्याचा संशयावरून त्याला मारहाण करण्यात येऊ लागली. त्यानंतर जमावापैकी एकाने त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून नंतर त्याला पेटविण्यात आले. या घटनेमध्ये संबंधित मुलगा ६५ टक्के भाजला आहे. त्याला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून, बाकीच्या दोघांचा शोध घेण्यात येतो आहे. इब्राहिम मेहबूब शेख (३५, कसबा पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.