पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका अडीच वर्षांच्या मुलीची  बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री दीड वाजता  ही मुलगी पिंपळे सौदागर येथील लेबर कँप येथील वस्तीतून बेपत्ता झाली होती . या चिमुकलीवर बलात्कार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. अगोदर तिच्यावर बलात्कार करण्यात आला व नंतर अज्ञात नराधमाने तिचा गळा घोटून खून केला आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी सांगितले आहे.

मुलगी बेपत्ता झाल्याचे कळताच तिच्या आई वडिलांनी तिचा शोध सुरु केला.  दोन तास म्हणजेच पहाटे तीन वाजेपर्यंत या मुलीचा तिच्या आई वडिलांनी शोध घेतला. त्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले. सांगवी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि या मुलीचे आई-वडील मुलीचा शोध घेत होते. अखेरीस मिलिट्री कॅम्पची भिंतीलगत असलेल्या  कंपाउंडच्या आत पाण्याच्या खड्ड्यात या मुलीचा मृतदेह पहटेच्या सुमारास सापडला होता. तिचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण शोधण्यासाठी  मृतदेह औंध रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चारजणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.