कासेवाडी येथून बेपत्ता झालेल्या तरुणांना गडचिरोली येथील जंगलात नक्षलवाद्यांकडे प्रशिक्षणासाठी अरुण भेलके यानेच पाठविल्याचे तपासात समोर आले आहे. ज्या पुण्यातील तरुणाला प्रशिक्षणासाठी परत पाठविणार होता, त्यानेच ही माहिती दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिली आहे. भेलके व त्याच्या पत्नीकडे तपास करण्यासाठी त्यांच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिले.
भेलके व त्याची पत्नी कांचन ननावरे ऊर्फ सोनाली पाटील (वय ३८, रा. कान्हेफाटा, मूळ- चंद्रपूर) यांना २ सप्टेंबर रोजी एटीएसने अटक केली होती. त्यांच्याकडे बनावट नावाचे पॅनकार्ड, आधारकार्ड मिळाल्याने त्यांच्यावर बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. भेलके व त्याची पत्नी कांचन हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) यांचे सदस्य असून या संघटनेसाठी तरुणांची भरती करण्याचे काम करीत होते. जानेवारी २००८ मध्ये चंद्रपूर पोलिसांनी भेलके व इतर काही जणांच्या घरावर छापे टाकून त्यांच्याकडून नक्षलवादी साहित्य जप्त केले होते. या प्रकरणी दाखल गुन्ह्य़ात जामीन मिळाल्यानंतर भेलके व त्याची पत्नी हे फरार होऊन पुणे परिसरात नक्षलवादी गटासाठी काम करीत होते. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ते गेल्या एक वर्षांपासून पुण्यात वेगवेगळ्या नावाने राहात असल्याचे समोर आले आहे. तपास केल्यानंतर त्यांच्याकडे ४२ सीडी मिळाल्या असून त्यामधील एका सीडीत नक्षलवादी जवानाला मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. त्याबरोबरच लष्कराच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या दोघांवर एटीएसने बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली होती. त्यांना न्यायालयाने २२ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता.
या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता एटीएसने तपासाची माहिती दिली. कासेवाडी येथून बेपत्ता झालेले तरुण गडचिरोलीच्या जंगलात प्रशिक्षणासाठी भेलके याने पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ज्या युवकाला प्रशिक्षणासाठी गडचिरोली या ठिकाणी पाठविणार होते, त्यातील एक साक्षीदार एटीएसला मिळाला आहे. त्याने भेलके याला ओळखले आहे. याबाबत तपास करायचा आहे. तसेच, पोलीस चौक्यांवर हल्ले करून तेथील शस्त्र पळविण्याबाबतची चिठ्ठी त्याच्याकडे पोलिसांना मिळाली आहे. याबाबत तपास करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकील विकास शहा यांनी केली. त्याला आरोपीच्या वकिलांनी विरोध केला. न्यायालयाने दोघांच्या कोठडीत २६ सप्टेंबपर्यंत वाढ केली.