तीन वर्षांचा चिमुकला खेळता खेळता चुकून रस्त्यावर आला आणि तो घराचा रस्ता विसरला. वंश विलास चव्हाण अस या चिमुकल्याच नाव आहे. देहूरोड पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या दोन तासात चिमुकला बहिणीच्या कुशीत विसावला आहे. मंगळवारी सायंकाळी रावेत चौकी जवळ वंश रडत थांबला असल्याचं पोलिसांनी पाहिलं होतं. चौकीत नेऊन त्याच्याकडे विचारणा केली मात्र त्याला काही सांगता येत नव्हतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी रावेत चौकी येथील पोलीस कर्मचारी हे दुचाकीवर गस्त घालत होते. तेव्हा, रावेत चौकात अवघ्या तीन वर्षांचा वंश रडत थांबला असून त्याच्या सोबत कोणी नसल्याचे  पाहिल्यावर पोलीस कर्मचारी त्याच्या जवळ गेले. त्यांना वंश हरवला असल्याचा संशय आला. पोलीस कर्मचारी यांनी त्याच्याकडे विचारणा केली, परंतु त्याच्या नावा व्यतिरिक्त त्याला काहीच सांगता येत नव्हते. अखेर पोलिसांनाच त्याच्या पाल्याचा शोध घ्यावा लागला. वंशला सोबत घेऊन पोलिसांनी परिसर पिंजून काढला. मात्र काहीच समजत नव्हतं.

दरम्यान, पोलीस एका तीन वर्षांच्या लहान मुलाला घेऊन त्याचे आई वडील शोधत असल्याचे वंश च्या सख्ख्या बहिणीला समजले. अखेर बहीण पूजा पवार यांनी पोलीस चौकी गाठत संबंधित माहिती दिली. पोलिसांची खात्री पटताच वंश ला सुखरूप त्यांच्या बहिणीच्या स्वाधीन केले. वंश च्या वडिलांचे निधन झालेले असून आई भोंडवे वस्ती येथे राहते, तर वंश हा मोठ्या बहिणीकडे काही दिवसांसाठी आला होता. तो घरासमोर खेळत असताना अचानक पळत पळत रस्त्यावर आला आणि परत जाण्याचा रस्ता विसरला अस बहिणीने सांगितलं आहे. काही अघटित घडण्याच्या अगोदर पोलिसांच्या तो नजरेस पडला. त्यामुळे बहिणीची आणि त्याची भेट घडू शकली. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार पोलीस कर्मचारी नवीन चव्हाण, गुजर, नंदनलाल राऊत, संजय आंधळे यांनी केली आहे.