करोना प्रसाराच्या भीतीनं रेल्वे सेवा मर्यादीत स्वरूपात सुरू असून, याचा मोठा भार एसटीवर आला आहे. त्यामुळे गर्दी होताना दिसत असून, राज्य सरकारनं मुंबईतील लोकलच्या फेऱ्या वाढवण्याबरोबरच पुणे विभागातील लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ‘मिशन बिगिन अगेन’तंर्गत काढण्यात आलेल्या आदेशात हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारनं ऑक्टोबरसाठी मिशन बिगिन अगेनसाठी नियमावली जारी केली आहेत. ऑक्टोबरमध्ये अनेक सेवा व गोष्टींवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यातील रेस्टॉरंट सुरू करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर बार सुरू करण्यासही राज्य सरकारनं परवानगी दिली आहे.

एमएमआरमध्ये (मुंबई महानगर प्रदेश) लोकल गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारनं लोकलच्या फेऱ्या वाढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील लोकल रेल्वेसेवा सुरू करण्यासही हिरवा कंदील दाखवला आहे. पुणे विभागातील स्थानिक रेल्वेसेवा एमएमआरसाठी जारी करण्यात आलेल्या नियमावलीनुसार सुरू करण्यात येणार असून, पुण्याचे पोलीस आयुक्त नोडल ऑफिसर म्हणून काम पाहणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेशाअंतर्गत येणाऱ्या अनावश्यक वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या उद्योगांना उत्पादन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारनं राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य व केंद्र सरकारनं दिलेल्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करून ही रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. या उद्योगांमध्ये पुण्याहून ये-जा करणाऱ्या कामगारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या कामगारांनाही रेल्वे सेवा सुरू झाल्यानं मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे मुंबई-पुणे प्रवास करणारांची संख्या जास्त असल्यानं मागील काही दिवसांपासून त्यांना वाहतूक कोडींचा सामना करावा लागत होता. आता रेल्वे सुरू करण्याचा निर्णय झाल्यानं त्यांची यातून सुटका होणार आहे.