महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) बारावीच्या जीवशास्त्र विषयाच्या पुस्तकात चुकाच चुका असल्याचे समोर आले आहे. वनस्पतिशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. हेमा साने यांनी पुस्तकातील चुकांचा ८० पानी अहवाल बालभारतीला पाठवला असून, पुस्तकात व्याकरणाच्या चुकांसह वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक माहितीच्याही चुका झाल्या आहेत.

डॉ. साने गरवारे महाविद्यालयातून वनस्पतिशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या आहेत. गेल्या वर्षी त्यांनी अकरावीच्या पुस्तकातील चुका बालभारतीच्या निदर्शनास आणून देऊन त्या दुरुस्त करण्यासाठी पाठपुरावा के ला होता. त्यानंतर उत्सुकता म्हणून बारावीच्या जीवशास्त्र विषयाच्या पुस्तकाचा आढावा घेतला असता त्यातही त्यांना पुस्तकात चुकाच चुका असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी या चुकांच्या नोंदी करून योग्य माहितीसह सविस्तर अहवाल तयार करून बालभारतीला पाठवला आहे.

डॉ. साने म्हणाल्या, उच्च माध्यमिक स्तरावरील पुस्तके  तपासणे हे माझे काम नाही. पण गेल्या वर्षी अकरावीच्या पुस्तकात भरपूर चुका आढळल्याने बारावीचे जीवशास्त्राचे पुस्तक चाळल्यावर चुका आढळल्या. पुस्तकात व्याकरणाच्या मूलभूत चुकांपासून चुकीची वैज्ञानिक माहिती देण्यापर्यंतच्या चुका असणे गंभीर आहेत. के वळ दोन पुस्तकांत एवढ्या चुका आढळत असल्यास अन्य पुस्तकांची काय परिस्थिती असेल, याची कल्पनाही करता येत नाही. शैक्षणिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असल्याने बालभारती प्रशासनाने पुस्तक निर्मिती, अभ्यासक्रम संशोधनाकडे अतिशय गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. ही पुस्तके  अन्य राज्यातील विद्यार्थ्यांच्या हाती पडल्यास राज्याच्या शिक्षणाची अप्रतिष्ठा होईल.

काही उदाहरणे…

* अमिबा अँड पॅरामेशिया यांना प्राण्यांच्या गटात टाकण्याऐवजी वनस्पतीच्या गटात टाकण्यात आले आहे.

* द जिराफ बोर्न टॉल कु ड सरव्हाइव्ह इन फे मिन हिट एरियाज – जिराफ हा आफ्रिके तील वाळवंटी प्रदेशातील प्राणी असल्याने दुष्काळी, उष्ण (फेमिन हिट एरिया) हा उल्लेख चुकीचा ठरतो.

* पान क्रमांक २८३ – ‘व्हिटॅमिन ए इज अबंडन्ट – व्हेजिटेबल्स सच अ‍ॅज कॅ रट्स विच मोस्ट ऑफ द पुअर पीपल ऑफ द वल्र्ड कान्ट अफोर्ड. गोल्डन राइस इफ ग्रोन अँड इटन इन डेव्हलपिंग कन्ट्रीज वुड रिड्यूस द व्हिटॅमिन ए डेफिशिअन्सी’ असा उल्लेख आहे. शरीराची ‘व्हिटॅमिन ए’ची गरज लक्षात घेतल्यास दररोज किमान एक किलो भात खावा लागेल. गोल्डन राइसची किं मतही परवडणारी नाही.

पुस्तके  दरवर्षी अधिप्रमाणित के ली जातात. पुस्तकांवर आलेल्या प्रतिसादानुसार पुढील वर्षीच्या आवृत्तीमध्ये दुरुस्त्या केल्या जातात. त्यानुसार बारावी जीवशास्त्राच्या पुस्तकातील चुका दुरुस्त के ल्या जातील.

– दिनकर पाटील, संचालक, बालभारती

दुरुस्तीबाबत कळवण्याची तसदीही नाही…

गेल्या वर्षी अकरावीच्या पुस्तकांतील चुका निदर्शनास आणून दिल्यावर आधी बालभारतीकडून टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर काही चुका स्वीकारण्यात आल्या. नंतर पुस्तक पाहिले असता जवळपास सर्व चुका दुरुस्त करण्यात आल्या आहेत. चुका स्वीकारून दुरुस्ती केल्याचे कळवण्याची तसदीही बालभारतीने घेतली नसल्याबाबत डॉ. साने यांनी नाराजी व्यक्त केली.