महामार्गावरील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी वाहतुकीवर देखरेख ठेवणे आता शक्य होणार आहे. एमआयटी स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी ‘महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणाली’ चे प्रारूप तयार केले असून या वर्षांअखेर पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे, अशी माहिती एमआयटी स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. मिलिंद पांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
महामार्गावर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी एमआयटीमधील विद्यार्थ्यांच्या गटाने वाहतूक व्यवस्थापन प्रणाली तयार केली आहे. ‘टेलिमॅटिक्स’ तंत्राच्या आधारे ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्यासाठी राजदीप इन्फो या कंपनीने सहकार्य केले आहे. हवामान, हवाई देखरेख यंत्रणा, आपत्कालीन संपर्कासाठी इमर्जन्सी कॉल बॉक्स, नियंत्रण केंद्र, सीसीटिव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याची यंत्रणा अशा सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून राबवता येतात. महामार्गावरील वाहतूक, आद्र्रतेची माहिती, हवामान, वाऱ्याचा वेग, चुकीच्या मार्गिकेमधून वाहन चालवल्यास त्याची माहिती, दरड कोसळल्याचा इशारा, अपघाताची माहिती, वाहतुकीची घनता या बाबींवर नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून देखरेख करता येणार आहे. त्यामुळे महामार्गावर अपघात झाल्यास कमीतकमी वेळामध्ये मदत पोहोचणे शक्य होणार आहे. स्वयंचलित वाहतूक मापक हे या प्रणालीचे वैशिष्टय़ आहे. हा मापक महामार्गावरील प्रत्येक मार्गिकेत (लेनमध्ये) बसवलेला असतो. मार्गिकेमधून वाहन जाताच वाहनाचा वेग, टायरची रुंदी, अॅक्सलची लांबी, या गोष्टींची नियंत्रण कक्षामध्ये नोंद होते. ही प्रणाली बहुभाषिकही आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाने आखून दिलेल्या निकषांनुसार या प्रणालीची रचना आहे. ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर एमआयटी कोथरूडच्या परिसरातील प्रवेशद्वारावर बसवण्यात आली आहे. या वर्षांअखेर पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.
‘टेलिकॉम समिट’चे आयोजन
एमआयटी स्कूल ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंट आणि एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या संस्थांनी ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ आणि ‘डेलॉईट’ या संस्थांच्या सहकार्याने ‘टेलिकॉम समिट’चे आयोजन केले आहे. या परिषदेमध्ये ‘आयसीटीज अँड इम्प्रूव्हिंग रोड सेफ्टी’, ‘व्हेईकल टेलिमॅटिक्स-द रोड अहेड’ या विषयावर चर्चासत्रे होणार आहेत. या परिषदेदरम्यान विद्यार्थ्यांसाठींही विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद शुक्रवारी (३० ऑगस्ट) होणार आहे.