‘आपल्या सर्वच सहकाऱ्यांनी साधेपणाने समारंभ साजरे करावेत’ हा शरद पवार यांचा सल्ला धाब्यावर बसवून आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपला वाढदिवस ‘लक्षभोजना’ ने साजरा केला.
जगताप हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते. मात्र, त्यांचा विधानसभेला मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटल्याने ते अपक्ष उभे राहिले आणि निवडून आले. ते तांत्रिकदृष्टय़ा अपक्ष आमदार असले, तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारे आहेत.
राष्ट्रवादीचे मंत्री भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे आपल्या मुला-मुलीच्या लग्नानिमित्त केलेल्या उधळपट्टीवर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. या पाश्र्वभूमीवर साहेबांना मानणाऱ्या आमदार जगताप यांनी दुसऱ्याच दिवशी स्वत:च्या वाढदिवसानिमित्त नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानात लाखभर लोकांसाठी जेवणावळ आयोजित करून साहेबांचा सल्ला धाब्यावर बसवला. या जेवणावळीत सुमारे ७५ हजार लोक येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, हा आकडा लाखाच्या वर गेला. जगताप यांच्याकडून दरवर्षीच अशी जेवणावळ घालून वाढदिवस साजरा करण्यात येतो.