निवड प्रक्रिया डावलून थेट नियुक्ती

पुणे : शिस्तबद्ध पक्ष अशी स्वत:ची ओळख सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडून शहराध्यक्षपदाची निवड करताना पक्षानेच निश्चित केलेली सर्व प्रक्रिया डावलल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. शहराध्यक्ष निवडीची पक्षाची निश्चित पद्धती असतानाही प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही सर्व प्रक्रिया धुडकावून देत पक्षाच्या शहराध्यक्षपदी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांची थेट नियुक्ती सोमवारी केली. मिसाळ पक्षाच्या पहिल्या महिला शहराध्यक्ष ठरल्या आहेत.

sharad pawar
बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
Rahul Akhilesh jodi
राहुल-अखिलेशची जोडी सात वर्षानंतर निवडणुकीच्या रणांगणात, २०१७ ची पुनरावृत्ती होणार की नवा इतिहास घडणार?
dcm devendra fadnavis on maratha reservation solution
‘मागची दहा वर्षे ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी’, मोदींच्या तिसऱ्या टर्मबद्दल फडणवीस म्हणाले…

भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी योगेश गोगावले यांची सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान नियुक्ती करण्यात आली होती. शहराध्यक्ष बदलले जाणार असल्याची चर्चा पक्षात गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यासाठी काही नावांची चर्चाही पक्षात सुरू झाली होती. त्याबाबतची अधिकृत घोषणा सोमवारी संध्याकाळी करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिसाळ यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करून त्यांना नियुक्ती पत्र दिले. मावळते शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

‘पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याचा आनंद झाला आहे. पक्षाच्या माध्यमातून समाजासाठी केलेल्या कामाची पक्षाने दखल घेतली आहे. लोकप्रतिनिधीबरोबर एक संघटक म्हणून मी ही नवी जबाबदारी पेलू शकेन, असा मला विश्वास आहे. या नियुक्तीकडे मी एक मोठी जबाबदारी म्हणून पाहात असून पुढील काळात लोकप्रतिनिधी आणि पक्षसंघटक म्हणून मी पूर्ण क्षमतेने कार्यरत असेन. पक्षाचा विचार आणि शासनाच्या विकासाभिमुख योजनांचा प्रसार करण्याला प्राधान्य राहणार असून संघटना अधिक बळकट करण्यासाठी कार्यरत राहीन,’ अशी प्रतिक्रिया माधुरी मिसाळ यांनी दिली.

मिसाळ या सन २००७ मध्ये नगरसेविका म्हणून महात्मा फुले मंडई या वॉर्डातून विजयी झाल्या. त्यानंतर सन २००९ मध्ये त्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या. सन २०१४ मध्ये त्या दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाल्या. पक्षाच्या चिटणीस, महाराष्ट्र प्रदेशच्या संयोजिका म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

दरम्यान, शहर सरचिटणीस म्हणून स्वीकृत नगरसेवक गणेश बीडकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

विधानसभा उमेदवारीचे काय?

सन २००९ पासून माधुरी मिसाळ पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. आगामी निवडणुकीतही त्यांना पुन्हा संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र त्यांची शहराध्यक्षपदी निवड केल्यामुळे मिसाळ यांचा पत्ता कापण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. बीडकर हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे जवळचे मानले जातात. लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर बारामती मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीमुळे बीडकर यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

‘हेडमास्तरकी’ भोवली?

मावळते शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गोगावले यांनी नगरसेवकांवर चांगला वचक ठेवला होता. पक्षाची ध्येयधोरणे आणि कार्यक्रम राबवण्यासाठी तसेच जाहीरनाम्यातील अनेक योजनांना गती देण्यासाठी ते आग्रही राहिले. ते त्यासाठी सातत्याने नगरसेवकांच्या बैठका घेत होते. महापालिकेची मुख्य सभा आणि स्थायी समितीच्या बैठकांपूर्वीही ते नगरसेवकांच्या बैठका घेत होते. त्यांच्या या ‘हेडमास्तरकी’मुळे काही नगरसेवक त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. त्यातच लोकसभा निवडणुकीसाठीही ते उमेदवारीच्या शर्यतीमध्ये आले. शहरातील काही आमदारांशी त्यांचे खटके उडत असल्याचीही चर्चा होती. त्यामुळेच त्यांची तडकाफडकी बदली केल्याची चर्चा आहे.