पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास मी उत्सुक आहे. गेली ३८ वर्षे पक्षाच्या माध्यमातून नागरिकांची कामे करीत असून कधीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे तिकिटासाठी पक्षश्रेष्ठी निष्ठेचा विचार करतील, असा विश्वास आमदार मोहन जोशी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे चारही धरणांतून अतिरिक्त पाणी सोडून देण्यापेक्षा शहराला दोनवेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी विधान परिषदेत केली. ही मागणी राज्य सरकारने मान्य केली असून त्यामुळे पुणेकरांची पाणीकपातीतून सुटका झाली असल्याचे सांगून मोहन जोशी म्हणाले, गेल्या दोन वर्षांत कोटय़ावधी रुपये खर्चून रस्ते करण्यात आले. पण, यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या रस्त्यांच्या दुर्दशेचा विषय पावसाळी अधिवेशनात मांडला. खड्डे त्वरित दुरुस्त करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली.
शिंदेवाडी दुर्घटना, पुण्याच्या वाहतुकीसाठी गरजेचा असलेला मेट्रो प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची (एसआरए) नियमावली, शहराचा विकास आराखडा, सुनियोजित विकासासाठी पुणे महानगर विकास प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी, त्याचप्रमाणे महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे अशा महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडली, असेही जोशी यांनी सांगितले.