देवेंद्र फडणवीस यांचे मत

पुणे : अलीकडे ‘होर्डिग नेतृत्व’ हा नवा प्रकार आला आहे. काल-परवापर्यंत कोणालाही माहिती नसलेली मुले स्वत:च्या नावाचे होर्डिग लावून अमुक एक दादा, तमुक एक दादा होतात. मात्र असे नेतृत्व आश्वासक होऊ शकत नाही. आव्हानांच्या काळात जे उभे राहाते, तेच खरे नेतृत्व असते आणि खऱ्या नेतृत्वाची कसोटीही तेथेच लागते, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त के ले.

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या एक वर्षांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन देंवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. शिवाजीनगर मतदार संघात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘अटलवार्ता’ या नियतकालिकाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.

फडणवीस म्हणाले, की लोकप्रतिनिधी हा सेवक असतो. त्याने जनतेला उत्तरदायी असलेच पाहिजे. याच भावनेतून वर्ष संपले की, आपल्या कामाचा हिशोब देणे ही भाजपची परंपरा होती आणि आहे. सिद्धार्थ शिरोळे यांनी या परंपरेला साजेसे काम के ले आहे. लोकप्रतिनिधी हा समाजात, जनतेमध्ये फिरणारा असावा. त्यामुळे त्याची प्रगल्भता, प्रश्नांची जाण वाढते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, की कामाचा अहवाल देणे ही रामभाऊ म्हाळगी यांनी घालून दिलेली आदर्श परंपरा आहे. आपण काय के ले आहे आणि काय करायचे राहिले आहे, हे आपल्याला आणि जनतेला अहवालामुळे समजते. शोधक वृत्ती, वैचारिक बैठक, समाजासाठी काम करण्याची निष्ठा आणि कामासाठी पाठपुरावा करणे हे गुण शिरोळे यांच्यात दिसतात.