महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अ‍ॅमेझॉनमधील वाद चिघळत चालला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस आल्यानंतर मनसे आक्रमक झाली असून अ‍ॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडण्यात आलं आहे. पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

राज ठाकरेंना नोटीस
मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली आहे. यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कोर्टाने राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरेंना दिंडोशी न्यायालयाची नोटीस; अ‍ॅमेझॉनसोबतचा वाद चिघळला
“राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार”

न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अ‍ॅमेझॉनला दिला होता. राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार अशी प्रतिक्रिया अखिल चित्रे यांनी दिली होती.

काय आहे नेमका वाद –
अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अॅप सुरू करावं, अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. याशिवाय ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी परिसरात लावण्यात आले होते.

विशेष म्हणजे मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या मागणीची अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अ‍ॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर अ‍ॅमेझॉनचं शिष्टमंडळ मुंबईत आलं होतं.