पुण्यात होणारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिलीच प्रचार सभा रद्द झाली आहे. या सभेपासून राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुकणार होते. पण पावसाच्या खेळामुळे अखेर ही सभा रद्द करावी लागली आहे. काल रात्री पाऊस झाल्यानंतर सभा रद्द होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी लगेच मैदान सुकवण्याचा प्रयत्न केला. मैदानातून चिखल काढला.

मैदान सुकवण्यासाठी वाळू आणि माती टाकली. पण पावसाने या सर्व मेहनतीवर पाणी फिरवले आहे. हवामान खात्याने आज संध्याकाळी सुद्धा पावसाची शक्यता वर्तवली होती आणि तसेच घडले. त्यामुळे अखेर ही सभा रद्द झाली आहे. आजची सभा रद्द झाली असली तरी उद्या गोरेगाव आणि बांद्रा येथे दोन सभा होतील.

आजपासून राज्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार होती. पुण्यातून राज ठाकरे प्रचाराचा शुभारंभ करणार होते. पुण्यातील नातू बाग येथील मैदानावर राज ठाकरे यांची सभा होणार होती. काल रात्री पाऊस झाल्याने, मैदानावर चिखल आणि पाणी साचले होते. त्यामुळे सभेबद्दल अनिश्चितता निर्माण झाली होती. पण मनसेचे नेते, कार्यकर्त्यांनी युद्धपातळीवर मैदानाच्या साफसफाईचे काम हाती घेतले होते. मैदानातून चिखल काढण्यात आला. मैदान सुकवण्यासाठी वाळू आणि माती टाकण्यात आली.

बऱ्याच दिवसांपासून शांत असलेले राज ठाकरे आज काय बोलणार ? त्यांच्या निशाण्यावर कोण असणार? भाजप-शिवसेनेची कुठली प्रकरणे ते बाहेर काढणार? याबद्दल राजकीय तज्ञांपासून सर्वांनाच उत्सुक्ता होती. मध्यंतरी राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर राज ठाकरे शांत झाले होते. एरवी राज ठाकरे सोशल मीडियावर बरेच सक्रीय असतात. पण तिथे सुद्धा त्यांनी काहीही भाष्य केले नाही. त्यामुळे मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली होती. नेते आणि कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा होती. अखेर राज ठाकरे यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.

मुंबई, पुणे, नाशिक या शहरी भागात मनसेचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. त्यामुळे मनसेने उमेदवारी देताना ग्रामीण भागापेक्षा शहरी भागावर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या वेळ मनसेचे उमेदवार रिंगणात उतरले नव्हते. पण राज ठाकरे यांची प्रत्येक सभा गाजली होती. भर सभेमध्ये व्हिडिओ दाखवून राज ठाकरे मोदी सरकारच्या आश्वासनांची पोलखोल करत होते.

‘लावा रे तो व्हिडिओ’ची सोशल मीडियावर बरीच चर्चा होती. राज ठाकरे यांच्या आक्रमक प्रचारामुळे अखेर आशिष शेलार यांना प्रेझेंटेशन करुन मनसेच्या आरोपांना उत्तर द्यावे लागले होते. आता भाजपा-शिवसेनेच्या तुलनेत मनसेच्या प्रचारात तितका जोर दिसलेला नाही. पण राज यांच्या एकासभेने सगळे वातावरण बदलू शकते. राज यांनी दिलेले काही उमेदवार नवखे असले तरी राज यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्यावर राज यांच्या भाषणाचा प्रभाव पडू शकतो. लोकसभेला मोदी-शाह यांच्या विरोधात जोरदार प्रचार करुनही फायदा झाला नव्हता. पण प्रत्येक निवडणूक वेगळी असते. आता मंदी सदृश्य वातावरण आहे. त्यामुळे पुन्हा राज विरुद्ध शिवसेना-भाजपा असा सामना रंगू शकतो. पुण्यातील राज यांच्या पहिल्या सभेवर अजूनही पावसाचे सावट आहे. पुणे शहर आणि परिसरात आज सायंकाळी सहा नंतर जोरदार पावसाची शक्यता आहे.