महापालिकेच्या शहर सुधारणा, विधी, महिला व बालकल्याण आणि क्रीडा या चार समित्यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी पार पडली. या निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी आणि मनसे अशी युती झाली होती. या युतीने सर्व जागा जिंकल्या. शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी रुपाली पाटील, विधी समितीच्या अध्यक्षपदी सुनील गोगले, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी अर्चना कांबळे आणि क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी महेंद्र पठारे निवडून आले.
महापालिकेतील विविध समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करतानाच राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी तुटली होती. विविध समित्यांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांची युती झाल्यामुळे आणि त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे या युतीचे सर्व उमेदवार शनिवारी अपेक्षेप्रमाणे निवडून आले. शहर सुधारणा आणि महिला व बालकल्याण या दोन समित्यांची अध्यक्षपदे मनसेला मिळाली, तर विधी आणि क्रीडा या दोन समित्यांची अध्यक्षपदे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली. साखर आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. या प्रत्येक समितीमध्ये राष्ट्रवादीचे पाच, मनसेचे तीन, काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी दोन, तर शिवसेनेचा एक सदस्य आहे.
शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी मनसेच्या रुपाली पाटील आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे प्रदीप गायकवाड विजयी झाले. विधी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुनील गोगले आणि उपाध्यक्षपदी मनसेच्या मीना परदेशी विजयी झाल्या. महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी मनसेच्या अर्चना कांबळे आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सुषमा निम्हण विजयी झाल्या. क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे महेंद्र पठारे विजयी झाले. या समितीच्या उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या मनीषा चोरबेले यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्या यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आठ तर  युतीच्या उमेदवारांना तीन मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीसाठी नसल्यामुळे त्यांच्या सदस्यांनी या वेळी मतदान केले नाही.