08 March 2021

News Flash

मनसेकडून पुण्यात दीपक पायगुडेंच्या उमेदवारीमुळे भाजप कार्यकर्त्यांत संभ्रम

निवडून येणारे खासदार पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील, असे सांगत राज ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात मात्र पुण्यातून दीपक पायगुडे यांना उमेदवारी दिली आहे.

| March 10, 2014 03:25 am

निवडून येणारे खासदार पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील, असे सांगत राज ठाकरे यांनी राज्यात मनसेचे सहा उमेदवार शिवसेनेच्या विरोधात उभे केले असले, तरी भाजपच्या विरोधात मात्र पुण्यातून दीपक पायगुडे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे पुण्यातून भाजपच्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्यास विलंब होत असल्याने भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंतप्रधानपदासाठी भाजपकडून नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर झाल्यापासून पुण्यातून कोणत्याही परिस्थितीत यंदा भाजपचा खासदार निवडून आणायचा असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र, उमेदवाराचे नावच निश्चित होत नसल्याने पूर्वीपासूनच अस्वस्थता व संभ्रम होता. राज ठाकरे व गडकरी यांच्या मध्यंतरी झालेल्या भेटीनंतर मनसेने लोकसभेसाठी उमेदवार उभे करू नयेत, अशीही चर्चा राज्यात झाली. एकीकडे भाजपच्या उमेदवाराची निश्चिती नाही व दुसरीकडे मनसेकडून पायगुडेंच्या उमेदवारीने संभ्रमात भरच पडली आहे. भाजपमध्ये शहराध्यक्ष अनिल शिरोळे आणि आमदार गिरीश बापट या दोघांचीच नावे सुरुवातीपासून चर्चेत होती. मात्र, त्यानंतर प्रकाश जावडेकर आणि माजी खासदार प्रदीप रावत यांचीही नावे चर्चेत आली.
पायगुडे यांना मनसेकडून मागील लोकसभा निवडणुकीतच उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र, त्यांनी त्यास नकार दिल्यानेच रणजित शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली. राज्यात युतीची सत्ता असताना पायगुडे हे शिवसेनेचे आमदार होते. मध्यंतरीच्या काळात ते सक्रिय राजकारणापासून दूर झाले. मात्र, लोकसेवा बँक, लोकसेवा प्रतिष्ठान व सैनिकी शाळेच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम लक्षणीय आहे. मागील काही दिवसांपासून ते राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्याने ते लोकसभा लढवतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. ती शक्यता अखेर खरी ठरली. आमदार व महापालिकेतील प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर पायगुडे निवडणुकीत चांगली लढत देऊ शकतात. त्यामुळे भाजपला आता पुण्यात मनसेशी स्पर्धा करावी लागेल, हे स्पष्ट झाले आहे.
 
भाजपला पुनरावृत्तीची धास्ती?

मागील निवडणुकीत मनसेचे रणजित शिरोळे यांना ७५ हजार मते पडली होती, तर भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांचा काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांनी २५ हजार मतांनी पराभव केला होता. भाजपच्या पराभवाला मनसेची उमेदवारी कारणीभूत ठरल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले होते. तोच प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी बरेच प्रयत्न झाले. मात्र, दीपक पायगुडे मनसेकडून िरगणात उतरल्याने त्याची पुनरावृत्ती होण्याची धास्ती भाजपला यंदाही आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2014 3:25 am

Web Title: mns candidacy to deepak paigude
Next Stories
1 तुल्यबळ प्रतिस्पर्धी नाही म्हणणारे आढळरावच घाबरतात – देवदत्त निकम
2 नर्मदा परिक्रमेच्या मार्गावरील रहिवाशांना मदतीसाठी ‘निनाद, पुणे’ संस्थेचा संकल्प
3 बधिरपणाने जगणे मला मान्य नाही – सानिया
Just Now!
X