आगामी सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पुणे दौऱ्याला सुरूवात केली आहे. तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यांमध्ये राज ठाकरे शाखाध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. बैठकीला सुरूवात झाली आहे. या बैठकीला येणार्‍या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा मोबाईल फोन गेटवर जमा करण्यात येत आहे. बैठकी मधील माहिती प्रसार माध्यमांना मिळता कामा नये. याबाबतची खबरदारी घेतली जात असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या कारभाराविरोधात राज्यभर रान पेटवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा आघाडीला काही केल्या झाला नाही. तर उलट भाजप आणि सेनेचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले. या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना. आता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. तर यामध्ये मनसे देखील मागे नसून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील अशोकनगर येथे तीन दिवसीय शहरातील विधानसभा मतदारसंघ निहाय अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या बैठकीला सकाळपासून सुरुवात झाली आहे. तर बैठकीसाठी प्रसारमाध्यमांना देखील आतमध्ये प्रवेश तर नाहीच. पण बैठकीला येणार्‍या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल फोन गेटवर जमा करण्यात आले आहे.

बैठकीमधील कोणत्याही प्रकारची माहिती प्रसारमाध्यमांना मिळता कामा नये. या पार्श्‍वभूमीवर थेट राज ठाकरे यांच्याकडून आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याची काळजी घेण्यात आली आहे. तसेच पुण्यात आजपासून होणार्‍या तीन दिवसीय बैठकी दरम्यान मनसैनिकांना राज ठाकरे काय कानमंत्र देतात हे पाहावे लागणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पुण्यानंतर राज ठाकरे ठाणे, नाशिक, पालघर, मुंबईमधील परिस्थितीचाही आढावा घेणार आहे. विधानसभेच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचे वेळापत्रक समोर येईल.