खासगी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुरू असलेली देणग्यांची पद्धत पूर्णत: बंद झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली असून तसा निर्णय राज्य शासनाने घ्यावा यासाठी मनसेतर्फे पुण्यात आंदोलन केले जाणार आहे.
मनसेचे खडकवासला मतदारसंघ उपाध्यक्ष चंद्रकांत गोगावले आणि सचिव ऋषी सुतार यांनी मंगळवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. खासगी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये फार मोठय़ा रकमा डोनेशन म्हणून घेतल्या जात असून गुणवत्तेचा कोणताही विचार न करता मोठय़ा देणग्या घेऊन प्रवेश दिले जात आहेत. हे प्रकार सर्रास घडत असूनही शुल्क व देणग्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिक्षण शुल्क समितीसारख्या यंत्रणा त्याकडे डोळेझाक करत आहेत. अशा शिक्षण संस्थांवर नियंत्रण आणणे गरजेचे असून त्यासाठी आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
खासगी शाळा, महाविद्यालयात प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या देणग्या रद्द कराव्यात, त्या ऐवजी शिक्षण शुल्कात माफक बदल करावेत, शैक्षणिक संस्थांचा आर्थिक लेखाजोखा पारदर्शक असावा, व्यवस्थापन कोटा पूर्णत: रद्द करावा आदी अनेक मागण्या करण्यात आल्या असून त्यांची पूर्तता एक महिन्यात करावी अशी मनसेची मागणी आहे. या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी १४ जुलै रोजी कात्रज पासून एका पदयात्रेचेही आयोजन पक्षातर्फे करण्यात आले आहे.