महापालिकेच्या मुख्य सभेत केलेल्या आंदोलनाबाबत कोणतीही माफी वा दिलगिरी व्यक्त न करण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाम राहिल्यामुळे अखेर महापौरांची विनंती आणि सभागृहनेत्याने मागितलेली माफी यानंतर अधिकाऱ्यांनी सभांवर टाकलेला बहिष्कार मंगळवारी मागे घेतला.
मनसेच्या नगरसेवकांनी गेल्या मंगळवारी (२३ जुलै) मुख्य सभेत आयुक्तांच्या विरोधात आंदोलन केले होते. त्या सभेत मनसेकडून आयुक्तांचा अपमान झाल्याच्या निषेधार्थ महापालिकेतील सर्व अधिकाऱ्यांनी सभा तसेच बैठकांवर बहिष्कार घातला होता. मनसेच्या नगरसेवकांना निलंबित करावे या मुख्य मागणीसह अन्यही काही मागण्या अधिकाऱ्यांनी केल्या होत्या. पर्यावरण अहवाल सादर करण्यासाठी मंगळवारी महापालिकेची खास सभा बोलावण्यात आली होती. या सभेत मनसेने दिलगिरी व्यक्त करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून पाऊण तास चर्चा सुरू होती. त्यानंतर मनसेचे गटनेता वसंत मोरे आणि नगरसेवक बाबू वागसकर यांनी सभेत निवेदन केले.
‘मनसेचा तसा हेतू नव्हता’
आम्ही पुणेकरांच्या हितासाठी आंदोलन केले. तो प्रश्न कोणी वैयक्तिक घेऊ नये. तसा मनसेचा कोणताही हेतू नव्हता, असे वागसकर यांनी या वेळी सांगितले. त्यानंतर मोरे म्हणाले, की महापौरांच्या विनंतीला मान देऊन मी निवेदन करत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राहावा म्हणून मनसेकडूनही प्रयत्न केले जातील. मात्र, या मुद्यावर दोन्ही बाजू समजल्या गेल्या पाहिजेत.
‘पुन्हा असे घडू नये’
जो प्रकार सभागृहात घडला, तशा प्रकारांमुळे संपूर्ण प्रशानाचेच मनोधैर्य खचते. दोन्ही घटकांना एकत्रितपणे काम करायचे आहे. त्यासाठी एकमेकांचा सन्मान राखणे गरजेचे आहे. यापुढे अशा घटना होणार नाहीत अशी अपेक्षा प्रशासन म्हणून आम्ही करत आहोत, असे निवदेन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी केले.
‘आचारसंहितेचेही पालन करा’
आंदोलन करताना आचारसंहितेचेही पालन झाले पाहिजे. झालेला प्रकार पुन्हा घडू नये. सर्व सदस्य सभागृहाची प्रतिष्ठा पाळायला बांधील आहेत, अशी अपेक्षा महापौर वैशाली बनकर यांनी या वेळी व्यक्त केली. त्यानंतर या वादावर पडदा पडला.
सदस्यांकडून सभागृहनेत्याचे कौतुक
मनसेकडून दिलगिरी व्यक्त केली जाणार नाही, हे सभेत स्पष्ट झाल्यानंतर सभांचे कामकाज चालण्यासाठी अखेर सभागृहनेता सुभाष जगताप यांनी निवेदन केले. ते म्हणाले, ‘प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही एकाच रथाची दोन चाके आहेत. दोघांमध्ये सामंजस्य असेल, तरच शहराचा विकास होतो. हे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न यापुढे होईल. सभागृहाची प्रतिष्ठा लक्षात घेऊन दोघांच्या वतीने मीच या सभागृहाची माफी मागतो.’ सभागृहनेत्याने दाखवलेल्या या मनाच्या मोठेपणाचे अनेक सदस्यांनी कौतुक केले.