मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘मल्टिप्लेक्स’ना इशारा

मल्टिप्लेक्समध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थाचे दर दोन दिवसांत कमी करा, अन्यथा खळ्ळ् खटय़ाक पद्धतीने आंदोलन करण्यात येईल,  असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेतर्फे पुण्यातील मल्टिप्लेक्सना देण्यात आला. आता या इशाराऱ्यानंतर मल्टिप्लेक्सकडून खाद्यपदार्थाचे दर कमी केले जाणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थाच्या दरांवर नियंत्रण का नाही, असा सवाल करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला महिन्याभरात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. या पाश्र्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने पुण्यातील मल्टिप्लेक्सना खाद्य पदार्थाचे दर कमी करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. किशोर शिंदे, चित्रपट कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी, संघटक सागर पाठक, आनंद कुंदूर, चेतन धोत्रे, नरेंद्र तांबोळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर आयकॉन चित्रपटात घोषणा देत आंदोलन केले. या चित्रपटात पाहणी केली असता पॉपकॉर्न, समोसे आदी खाद्यपदार्थ महाग विकले जात असल्याचे निदर्शनास आल्याने पुण्यातील सर्वच मल्टिप्लेक्सना दर कमी करण्याबाबतचे पत्र देण्यात आले आहे.

‘मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहणाऱ्या सर्वसामान्य प्रेक्षकाला खाद्यपदार्थाचे दर परवडत नाहीत. कुटुंबासह चित्रपट पाहणे खूप खर्चिक होऊ लागले आहे. खाद्य पदार्थाचे चढे भाव हे त्यामागील मुख्य कारण आहे. चित्रपटाच्या तिकिटापेक्षा खाद्य पदार्थ महाग, अशी परिस्थिती आहे. या पूर्वीही एक-दोन वेळा पत्र देण्यात आले होते. आता उच्च न्यायालयानेच मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थ महाग विकले जात असल्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत दर कमी न केल्यास मनसेच्या शैलीत आंदोलन करण्यात येईल आणि चित्रपटगृह बंद करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे,’ असे रमेश परदेशी यांनी सांगितले.

‘मल्टिप्लेक्स’मधील खाद्यपदार्थाच्या दरांबाबतचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. या बाबत काही बोलणे योग्य ठरणार नाही.    – अरविंद चाफळकर, संचालक, सिटीप्राईड