News Flash

मनसेचे ‘मिशन’ पुणे महापालिका!

नाशिक महापालिकेवर संपूर्ण लक्ष केंद्रीत केल्यानंतर तेथे मनसेला सत्ता मिळाली होती.

मागील महापालिका निवडणुकांमध्ये मनसेने नाशिक महापालिकेवर संपूर्ण लक्ष केंद्रीत केल्यानंतर तेथे मनसेला सत्ता मिळाली होती. त्याचवेळी पुणे महापालिकेत मनसे दुसऱ्या स्थानावर आली होती. सध्या नाशिक येथील मनसेची अवस्था डळमळीत झाली असून मनसेने आपली ताकद पुणे महापालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी एकवटली आहे. यासाठी एकीकडे प्रभागवार नागरिकांशी थेट संवाद साधणे, सोशल मिडियाचा प्रभावी वापर करणे आणि कचरा, वाहतूक, पाण्यासह नागरी प्रश्नांवर आक्रमक आंदोलने हाती घेण्याची योजना मनसेने आखली आहे.

पुणे महापालिकेच्या २०१२ मधील निवडणुकीत मनसेला पाच लाख १९ हजार मते मिळून २९ जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचा सहा लाख ३३ हजार मते मिळून ५१ जागी विजय झाला होता. त्या पाठोपाठ काँग्रेसला सुमारे पाच लाख मते मिळून २८ जागा तर भाजपला तीन लाख १४ हजार मते व २६ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला अडीच लाख मते मिळून १५ जगांवर समाधान मानावे लागले होते. यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वच पक्षांचे सुपडे साफ करत एकहाती सर्व जागा जिंकल्या होत्या. अर्थात त्यावेळी असलेली नरेंद्र मोदी यांची लाट व काँग्रेसविरोधी वातारवणाचा फायदा भाजपला मिळाला होता. मात्र गेल्या दोन वर्षांत राज्यात डाळी व भाज्यांसह जीवनावश्यक वस्तूंची झालेली वाढ, भ्रष्टाचाराच्या आरोपाने वेढलेले भाजपचे मंत्री, चौकशीच्या फेऱ्यात सापडलेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते, कमकुवत विरोधी पक्ष याचा बारकाईने अभ्यास करून मनसेने जोरदार पक्षबांधणी सुरु केली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याची जबाबदारी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यावर सोपविली असून गेल्या दोन महिन्यात त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. कार्यकर्त्यांंचे ३५ हून अधिक मेळावे घेतले असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील लोकांचे प्रश्न तसेच अन्य राजकीय गणितांचा अभ्यास करून घराघरात संपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. मनसेचे रवी धंगेकर हे पुण्यात सर्वाधिक म्हणजे १२ हजार मतांनी विजयी झाले असून वनिता वागसकर, बंडू ढोरे, किशोर शिंदे, आरती बाबर व साईनाथ बाबर, राजू पवार, वसंत मोरे, रुपाली पाटील, सुशीला नेटके, पुष्पा कनोजीया, राजा लायगुडे आदी प्रमुख नगरसेवकांच्या मतदारसंघात चार प्रभागांच्या होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन रणनिती तयार करण्यात आली आहे. जवळपास पन्नास जागा जिंकण्याचा विश्वास मनसेच्या नेत्यांना असून प्रभाग पद्धतीचा फायदा आपल्याला मिळेल हे भाजपचे स्वप्न धुळीला मिळविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला. लोकांना राष्ट्रवादीवर विश्वास राहिलेला नाही. भाजपने महागाई वाढवून सर्वसामान्यांचे जीणे हराम केले आहे. कचऱ्याचा प्रश्न पालकमंत्री गिरीश बापट सोडवू शकलेले नाहीत. महिला आज सुरक्षित नाहीत आणि महापालिकेतील राष्ट्रवादीच्या कारभाराला लोक कं टाळले आहेत, असेही नांदगावकर म्हणाले. आगामी काळात पुणेकऱ्यांच्या सर्व समस्यांवर मनसे स्टाईलने जोरदार आंदोलने हाती घेण्यात येणार असून त्यापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांचा विशाल मेळावा राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुण्यातील मनसेचे ताकद लक्षात घेऊन मनसेने ‘मिशन’ पुणे महापालिका हाती घेतले आहे.

 

नगरसेवकांवरील कारवाईबाबत मनसेची लवकरच बैठक

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान नगरसेवक राजेश बराटे यांचा भारतीय जनता पक्षामधील प्रवेश अपेक्षितच होता, अशी चर्चा मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे. दरम्यान, बराटे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात  गणेशोत्सवानंतर बैठक घेण्यात येणार असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत.  महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मनसेचे कर्वेनगर परिसरातील नगरसेवक राजेश बराटे आणि माजी नगरसेवक राजेंद्र गोरडे यांनी मंगळवारी रात्री भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. राजेश बराटे हे कर्वेनगर भागातून सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

मात्र पक्षात डावलले जात असल्यामुळे ते पक्षांतर करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून मनसेमध्ये होती. त्यामुळे बराटे यांचा भाजप प्रवेश अपेक्षितच होता. या पाश्र्वभूमीवर बोलताना मनसेचे गटनेते किशोर शिंदे म्हणाले की, पक्षाच्या वरिष्ठांना याची कल्पना देण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर यासंदर्भात बैठक घेऊन कडक कारवाई करण्यात  येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 1:57 am

Web Title: mns pune municipal corporation mission
Next Stories
1 ‘आयटीआय’प्रवेशांमध्ये सहा टक्क्य़ांनी वाढ
2 नऊ हजार पोलीस तैनात
3 भाजपवासी झालेले नगरसेवक धाडवेंना राष्ट्रवादी सोडवेना
Just Now!
X