टोल विरोधात मनसेने पुकारलेल्या रास्ता-रोको आंदोलनाचा पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात फुसका बार ठरला. अनेक ठिकाणी निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेली ही आंदोलने दहा-पंधरा मिनिटात संपुष्टात आली. साताऱ्याजवळच्या आणेवाडी टोलनाक्यावर तर आंदोलकांनीच पाठ फिरवली. पुण्यात काही ठिकाणी तसेच, कोल्हापूर जिल्ह्य़ात इचलकरंजी, कागल आणि चंदगडमध्ये घडलेल्या तुरळक दगडफेकीच्या घटना वगळता हे आंदोलन शांततेत पार पडले.
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूरमध्ये मनसेने या आंदोलनाची घोषणा केली होती. पोलिसांनीही आंदोलनाची संभाव्य व्याप्ती लक्षात घेत जागोजागीच्या टोलनाक्यांवर आणि महामार्गावर मोठा बंदोबस्त ठेवला होता. पुण्यात मंगळवारी रात्रीच पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेतले होते. मात्र, बुधवारी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हे आंदोलन जाणवलेही नाही. पुणे शहर व परिसरात आठ-दहा ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले. मात्र, पोलिसांनी वेळीच परिस्थिती आटोक्यात आणली. पुणे-मुंबई द्रुतगती रस्त्यावर बहुतांश नागरिकांनी वाहने आणलीच नाहीत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक तुरळकच होती.
पुणे-बंगळूरू महामार्गावर खेड शिवापूर, पाचवड, आणेवाडी, वाडे फाटा, ताथवडे, किणी आदी टोलनाक्यांवर मोठा बंदोबस्त ठेवला होता. परंतु प्रत्यक्षात दहा-बारा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी वगळता इथे मोठी आंदोलने झाली नाहीत. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना दिवसभरासाठी ताब्यात घेत नंतर सोडून दिले. सोलापूरजवळ पुणे रस्त्यावर झालेल्या आंदोलनास अल्प प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर शहरात टोलचा प्रश्न उग्र बनलेला असतानाही मनसेच्या आंदोलनास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जिल्ह्य़ात या आंदोलनातून इचलकरंजी, कागल आणि चंदगडमध्ये एसटीबसवर तुरळक दगडफेकीच्या घटना घडल्या.

आंदोलकांच्या प्रतीक्षेत पोलीस
पुणे-बंगळूरू महामार्गावर साताऱ्याजवळील आणेवाडी हा एक महत्त्वाचा टोलनाका आहे. टोलविरोधी आंदोलनात नेहमी या टोलनाक्यास लक्ष्य केले जाते. यामुळे आजच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर इथे कालपासूनच मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज सकाळी या पोलीस दलाच्या जोडीला अन्य सुरक्षा दलेही देण्यात आली होती. परंतु या ठिकाणी दिवसभरात कुणी आंदोलकच फिरकले नाहीत. अखेरीस संध्याकाळी पाचच्या सुमारास पोलिसांनी हा बंदोबस्त हटवला. पुण्याजवळ खेड-शिवापूर येथे आंदोलकांना १५-२० मिनिटांसाठी अर्धाच रस्ता अडवून धरला होता.