आगामी विधानसभेच्या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे प्रयत्न केले जाणार असून त्या तयारीसाठी या विभागाचा राज्यस्तरीय मेळावा शनिवारी (९ ऑगस्ट) पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.
मनसेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष अजय भारदे यांनी बुधवारी ही माहिती दिली. महाराष्ट्राची आगामी विधानसभा निवडणूक आणि सोशल मीडिया हा या मेळाव्याचा मुख्य विषय असून त्या बाबत मनसेचे माहिती तंत्रज्ञान विभागातील पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. ठिकठिकाणी माहिती तंत्रज्ञान विभाग स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली संघटनात्मक बांधणी तसेच महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने पक्षाचे मुद्दे योग्य प्रकारे जनतेपर्यंत पोहोचवणे, पक्षाने केलेली आंदोलने, विविध प्रश्नांसंबंधीची पक्षाची भूमिका पोहोचवणे, लोकांची मते जाणून घेणे अशा विविध बाबींवर माहिती तंत्रज्ञान विभाग काम करणार आहे. यासंबंधीची तसेच सोशल मीडियाचा वापर या विषयाची माहिती मेळाव्यात दिली जाईल, असे भारदे यांनी सांगितले.