रिलायन्स फाऊंडेशनच्या अस्तित्वात नसलेल्या जिओ शिक्षणसंस्थेला केंद्र सरकारने ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स’ चा दर्जा दिला असतानाच आता पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने यावरुन भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. ‘जिओ इन्स्टिट्यूट हरवले असून सापडल्यास बक्षीस मिळवा’ असे पत्रक मनविसेने काढले असून इन्स्टिट्यूट शोधणाऱ्या ११ लाख पैसे दिले जातील, असे मनविसेने म्हटले आहे.

कागदावरुन प्रत्यक्षात येण्यापूर्वीच जिओ इन्स्टिट्यूटला ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स’चा दर्जा मिळाल्याने वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या निर्णयाचे समर्थन केले आहे. दुसरीकडे पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जिओ इन्स्टिट्यूटविरोधात काढलेले पत्रक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

जिओ इन्स्टिट्यूट हरवले असून शोधून देणाऱ्यास ११ लाख पैशांचे पारितोषिक दिले जाईल, असे यात म्हटले आहे. याबाबत माहिती देताना मनविसे पुणे शहर अध्यक्ष कल्पेश यादव म्हणाले की, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्याच बरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आईओमध्ये समावेश करावा अन्यथा मनविसे या प्रकरणी तीव्र अंदोलन करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.