‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे सर्व भारतीय भाषा चिन्हभाषा स्वरूपात

श्रवणदोष असलेल्या दोन व्यक्ती खाणाखुणांच्या भाषेचा वापर करून एकमेकांशी अतिशय प्रभावीपणे संवाद साधतात, मात्र श्रवणदोष नसलेल्या सर्वसामान्य व्यक्तींसाठी श्रवणदोष असलेल्या कुटुंबीय, नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे हे नेहमीच आव्हानात्मक असते. हा अडथळा दूर करण्यासाठी सर्व भारतीय भाषा चिन्हभाषा स्वरूपात शिकण्याची संधी एका मोबाइल अ‍ॅपद्वारे भारतीयांना मिळणार आहे.

समजण्यासाठी सोपी असलेली पाच हजारपेक्षा अधिक चिन्हे आणि शब्दप्रयोग, ध्वनिचित्रफिती तसेच रेखाटने यांच्या मदतीने डीईएफ-आयएसएल या मोबाइल अ‍ॅपवर स्थानिक भाषेसाठी चिन्हभाषा शिकणे शक्य होणार आहे. श्रवणदोष असलेले आणि नसलेले अशा सर्वासाठी या अ‍ॅपचा वापर करता येणार आहे, मात्र श्रवणदोष नसलेल्यांना चिन्हभाषा शिकण्यासाठी या अ‍ॅपचा विशेष वापर होणे शक्य आहे. उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा (सीएसआर) भाग म्हणून लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोने डीफ एनेबल्ड फांउडेशनच्या सहाकार्यातून या मोबाइल अ‍ॅपची निर्मिती केली आहे.

लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एन. सुब्रमण्यम म्हणाले, श्रवणदोष असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्याशी संबंधित कुटुंब यांमध्ये संवाद प्रस्थापित होऊन त्यांचे आयुष्य सुधारावे यासाठी हे मोबाइल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. श्रवणदोष असणारे सर्व जण, त्यांचे दुभाषी, कुटुंबीय आणि शिक्षक यांना चिन्हभाषा शिकण्यासाठी हे अ‍ॅप मदत करेल.

त्यामुळे संवाद साधणे आणि विचारांची देवाणघेवाण करणे ही प्रक्रिया सहज शक्य होईल आणि श्रवणदोष असलेल्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणणे शक्य होईल. डीईएफच्या संचालक मंडळाचे संचालक आणि महासचिव हरीहर कुमार म्हणाले, डीईएफ ही श्रवणदोष असणाऱ्यांची, श्रवणदोष असणाऱ्यांसाठी आणि श्रवणदोष असणाऱ्यांनी सुरू केलेली संस्था आहे. श्रवणदोष असणाऱ्यांची

संवाद साधण्याची समस्या सोडवण्यासाठी ही संस्था काम करते. त्यांना समाजाशी जोडण्यासाठी तंत्रज्ञान आणि संसाधने विकसित करण्यावर संस्थेचा भर आहे. जगातील सर्वाधिक श्रवणदोष असलेल्या व्यक्ती भारतात असून त्यांची संख्या अठरा दशलक्ष एवढी आहे. स्थानिक भाषा आणि त्या भाषेची चिन्हभाषा केवळ अत्यल्प व्यक्तींना अवगत आहे. सांकेतिक भाषा आणि इंग्रजीतील संवाद कौशल्य वाढवण्यासाठी मोबाइल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये चित्रे, खुणा आणि अक्षरे यांचा वापर करण्यात आला आहे.