आपण डायल केलेला क्रमांक कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे. या मार्गावरील सर्व लाइन व्यस्त आहेत. आपण डायल केलेला क्रमांक तपासून पाहा.. एखाद्याचा मोबाइल क्रमांक डायल केल्यावर आपल्या मोबाइल कंपनीकडून अशी रेकॉर्ड करून ठेवलेली वाक्ये ऐकायला मिळतात. कारण एकच – यंत्रणा तोकडी अन् उदंड झालेले मोबाइल वापरकर्ते!
पुण्यासह राज्यात मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. सेल्युलर ऑपरेटर्स असोसएिशन ऑफ इंडिया (सीओएआय) यांच्याकडून उपलब्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार,महाराष्ट्र व गोवा (त्यात मुंबई महानगरीतील सीमकार्ड धारकांचा समावेश नाही.) येथील आयडिया, व्होडाफोन, एअरटेल, बीएसएनएल, एअरसेल आणि टेलिविंग यांच्या सीमकार्ड धारकांची संख्या डिसेंबर २०१३ मध्ये साधारण साडेपाच कोटींच्या जवळ होती. २०१४ या एका वर्षांत तब्बल एक कोटी नवीन मोबाइल सीमकार्ड धारकांची वाढ होत ती संख्या साडेसहा कोटींहून अधिक झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून मोबाइल कंपन्यांची यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. मोबाइल कंपन्यांच्या ग्राहकांमध्ये झपाटय़ाने वाढ होत असताना त्या प्रमाणात त्यांची यंत्रणा वाढलेली नाही. मोबाइल सीमकार्ड कंपन्यांकडे ग्राहकांची संख्या वाढत असताना या कंपन्यांकडून ज्या प्रमाणात पायाभूत सुविधा विकास करण्याकडे लक्ष दिले जात नाही, त्याचाच परिणाम ग्राहकांना विस्कळीत सेवा मिळण्यावर होत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असून त्याकडे मोबाइल कंपन्या दुर्लक्ष करीत आहेत.

असे का होते?
१. कॉल ड्रॉप होणे…
मोबाइलधारक प्रवास करत असताना, आपला कॉल मोबाइलच्या वेगवेगळ्या टॉवरकडे ट्रान्सफर होत असतो. एखाद्या टॉवरच्या क्षेत्रात त्या वेळेला मोबाइलचा वापर जास्त असेल, तर तेथे कॉल ड्रॉप होतो.
प्रवासात नसताना हे होत असेल तर त्यामागे, त्या भागातील टॉवरला व इतर यंत्रणांना असलेला वीजपुरवठा खंडित होणे किंवा त्यासाठीच्या केबल तुटणे अशी कारणे असू शकतात.
२. मोबाइल क्रमांक फिरवल्यावर आधी न लागणे, पुन्हा फिरवल्यावर लागणे..
मोबाइलचे क्षेत्र टॉवरनुसार ठरते. त्या टॉवरच्या क्षेत्रात त्या वेळी किती लोक मोबाइल वापरत आहेत, यावर आपला क्रमांक लागणार का, हे ठरते. क्रमांक फिरवल्यावर त्या क्षेत्रातील मोबाइल वापर जास्त असेल, तर फोन लागत नाही. मात्र, दरम्यानच्या काळात हा वापर कमी झाला की लगेचच फोन लागतो. मोबाइल वापर हा सेकंदासेकंदाला कमी-जास्त होत असतो.

‘‘पुणे शहरांत पुरेसे टॉवर्स आहेत. मात्र, काहीवेळा एखाद्या भागांत खूप उंच इमारतींची गर्दी असेल, किंवा टॉवर उभा राहिल्यानंतर नव्याने बांधकाम झाले असेल तर त्या भागांत रेंज मिळण्यास अडचण असू शकते. त्याचप्रमाणे एखाद्या भागांत टॉवर लांब असतो. पण आयडियासह सर्वच कंपन्या त्यासाठी बूस्टर सारख्या सुविधा उपलब्ध करून देतात. घरांतही कुठेच रेंज मिळत नाही असे सहसा घटत नाही. घराच्या एखाद्या भागांत पूर्ण रेंज असल्याचे दिसते. मात्र, त्याचवेळी दुसऱ्या एखाद्या खोलीत रेंज नसते, असे होते कारण टॉवर दुसऱ्या दिशेला असू शकतो किंवा त्या खोलीत रेंज मिळण्यासाठी आवश्यक वातावरण असत नाही. मात्र, रेंज मिळत नाहीत, त्याचे कारण टॉवर नाहीत असे नाही.’’
– आदित्य कुमार (आयडिया सेल्युलर)