पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या मोबाइल दुकानांना आज मनसेचा दणका बसला आहे. प्रमोशनसाठी या मोबाइल शॉपी रस्त्यावर अनधिकृत स्टेज उभारतात. त्यावर स्टेज शो केले जातात. शनिवार आणि रविवार या कार्यक्रमांमुळे वाहतूक कोंडी होते.

मोबाइल कंपन्या शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस जंगली महाराज रोडवर अनधिकृत स्टेज उभारतात. त्यामध्ये गेम शो घेतात, बक्षीसे वाटतात. याचा फटका रस्त्यावरच्या वाहतुकीला बसतो, तसेच सामान्य नागरिकांनाही त्याचा त्रास होतो. त्यामुळेच मनसेने खळ्ळखटॅक आंदोलन केले. मोबाइल शॉपींच्या या कार्यक्रमांबाबत वाहतूक पोलिसांना तक्रारी देण्यात आल्या आहेत. तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे हे आंदोलन करण्यात आल्याचे मनसेने म्हटले आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुहास निम्हण म्हटले की पोलिसांना तक्रार देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.