आषाढी वारीच्या सोहळ्याला स्वच्छता अभियानाचे वेध लागले आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आळंदी देवस्थानने यंदा प्रथमच मोबाइल स्वच्छतागृहाची (टॉयलेट) व्हॅन वारीमध्ये सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
देवस्थानचे विश्वस्त डॉ. प्रशांत सुरू यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, आळंदीहून माउलींचा पालखी सोहळा ९ जुलै रोजी प्रस्थान ठेवणार आहे. दरवर्षी पालखी सोहळ्यामध्ये आळंदी तसेच वारी मार्गावरील सर्वच ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होतो. त्याचबरोबरीने दैनंदिन कचऱ्याची समस्याही भेडसावते. यंदा प्रथमच देवस्थानने मोबाइल स्वच्छतागृहाची व्हॅन वारीसोबत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी देवस्थानने खर्च केला असून प्रत्यक्ष वारीमध्ये मोबाइल स्वच्छतागृहाचे संच ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे वारकरी महिलांची कुचंबणा काही प्रमाणामध्ये कमी होईल.
आळंदी देवस्थान समितीच्या जिल्हाधिकारी सौरभ राव तसेच अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीमध्ये स्वच्छता अभियान हाच यंदाच्या वारीचा केंद्रिबदू असेल असा निर्णय घेण्यात आला. ‘स्वच्छ वारी सुंदर वारी प्रसन्न वारी पवित्र वारी’ असे घोषवाक्य ठरविण्यात आले आहे. वारीतील प्रत्येक िदडीला देण्यासाठी ५० हजार कचरा बॅग्जचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवण्याची सोय असेल. प्रत्येकाने कचरा बॅगेतच टाकण्याविषयी जागृती केली जाणार असल्याचेही सुरू यांनी सांगितले.
बैलजोडीचा मान वरखडेंचा
माउलींच्या पालखीसाठी बैलजोडीचा मान पंरपरेनुसार सहा मानक ऱ्यांकडे आलटून-पालटून असतो. यंदाच्या वारीचा मान पांडुरंग वरखडे यांच्या कुटुंबाकडे असून त्यांची बैलजोडी यंदा माउलींचा पालखी रथ वाहून नेणार आहे.