पंढरीची वारी आणि पालखी सोहळ्याच्या परंपरेत बदल होत नसला, तरी बदलत्या काळानुसार वेळोवेळी पालखीतील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये मात्र बदल होत गेले आहेत. त्याच बदलाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे वारकऱ्यांच्या सुविधांमध्ये यंदा फिरत्या मोबाइल टॉवरचाही समावेश करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यातील सातत्याने बदलत गेलेल्या संपर्क यंत्रणेचा हा आधुनिक टप्पा समजला जातो आहे. वारकऱ्यांच्या सेवा- सुविधांबाबत पुणे जिल्हा प्रशासनाच्या बैठकीतही हा विषय घेण्यात आला होता.

आषाढीच्या सोहळ्यासाठी आळंदीतून प्रस्थान ठेवणारी संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी व देहूतून प्रस्थान ठेवणारी संत तुकोबांची पालखी दोन दिवसांच्या पुणे मुक्कामी येते. यंदा २९ व ३० जूनला पालख्यांचा पुण्यात मुक्काम आहे. पुणे शहराबरोबरच पालखीच्या प्रत्येक मुक्कामामध्ये व मार्गावर प्रशासनाच्या वतीने वारकऱ्यांना सेवा-सुविधा देण्यात येतात. मात्र, वारकऱ्यांनी सेवा करण्यात नागरिक, संस्था, संघटनाही पुढाकार घेत असतात. त्यातूनच वारकऱ्यांची भोजन व्यवस्था करण्यापासून पाय चेपून देण्याचा उपक्रमही राबविण्यात येत असतो.

वारीतील संपर्क यंत्रणा लक्षात घेतल्यास ती वेळोवेळी बदललेली असून, त्यानुसार सुविधेचे स्वरूपही बदलले आहे. पालखी सोहळ्यामध्ये पूर्वी संपर्कासाठी पत्र पाठविण्याची व्यवस्था होती. त्यासाठी टपाल खात्याने पुढाकार घेऊन यंत्रणा उभी केली होती. पत्त्याच्या जागी पालखी सोहळ्यातील दिंडीचे नाव व क्रमांक घालून पत्र पाठविल्यास ते संबंधिताला मिळत होते. नंतर दूरध्वनीचा काळ आला व बीएसएनएलच्या सहकार्याने पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी दूरध्वनीची सुविधा उपलब्ध करून दिली गेली. मागील काही वर्षांमध्ये पालखी सोहळ्यातील मोबाइल दिसू लागले. त्यामुळे बहुतांश मंडळींकडून मोबाइल चार्जिगची सुविधाही देण्यात येऊ लागली.

वारकऱ्यांच्या हातात आता मोबाइल दिसून येतो. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यास मोबाइलवरून घरच्या व्यक्तींशी, नातलगांशी, मित्रांशी संपर्क साधला जातो. मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या मोबाइल टॉवरची क्षमता कमी असल्यास व एकाच वेळी मोबाइलवरून अनेक जण संपर्क करीत असल्याने यंत्रणेत समस्या निर्माण होतात. आता सोहळ्यासाठी स्वत:चे फिरते मोबाइल टॉवर मिळणार असल्याने इतरांशी संपर्क सुकर होऊ शकणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून त्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.