News Flash

किशोरवयीन मुलांची व्यसनाधीनता रोखण्यासाठी ‘संयम’ 

‘सेल्फ अवेअरनेस इन यूथ फॉर अँटि-अ‍ॅडिक्शन मोटिव्ह’ या नावातून ‘संयम’ प्रकल्पाचा उद्देश पुरेसा स्पष्ट होतो

(संग्रहित छायाचित्र)

लहान वयात उपलब्ध असलेला इंटरनेटसारखा प्रचंड माहितीचा खजिना, हातात येणारा पॉकेटमनी आणि झपाटय़ाने बदलणारा काळ यामुळे किशोरवयीन मुले कुठल्याही व्यसनांच्या जाळ्यात अडकण्याचा धोका वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर मुले व्यसनाधीनतेकडे वळणारच नाहीत, अशी खबरदारी घेण्यासाठी ‘संयम’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ‘प्रज्ञा मानस संशोधिका’ आणि ‘ताराचंद रामनाथ राठी ट्रस्ट’तर्फे हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

‘सेल्फ अवेअरनेस इन यूथ फॉर अँटि-अ‍ॅडिक्शन मोटिव्ह’ या नावातून ‘संयम’ प्रकल्पाचा उद्देश पुरेसा स्पष्ट होतो. किशोरवयीन मुलांमधील अमली पदार्थाचे व्यसन, समाजमाध्यमे आणि मोबाइल, इंटरनेट, गेम्स सारख्या नवमाध्यमांचे व्यसन आणि धोकादायक लैंगिक वर्तन या विषयांवर या प्रकल्पातून काम करण्यात येणार आहे. पुणे शहरातील आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, स्वजाणीव तसेच स्वनियमनाच्या मदतीने व्यसनाधीनतेला प्रतिबंध व्हावा, त्यामुळे व्यसन लागण्याआधीच मुलांनी त्यापासून दूर राहावे यासाठी चळवळ उभी करणे हा या प्रकल्पाचा हेतू आहे.

‘ज्ञान प्रबोधिनी’ज इन्स्टिटय़ूट ऑफ सायकॉलॉजी’च्या डॉ. अनघा लवळेकर म्हणाल्या, शालेय शिक्षक आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यांना संयम प्रकल्पात अधिमित्र प्रशिक्षक (मेंटॉर) म्हणून काम करता यावे, यासाठी तीन दिवसांचे निशुल्क प्रशिक्षण आम्ही देणार आहोत. यामध्ये प्रशिक्षण साहित्याचा देखील समावेश आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात होणारे हे सलग तीन दिवसीय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आपापल्या परिसरातील शाळांमध्ये पस्तीस मिनिटांचे एक अशी बावीस ते पंचवीस सत्रे या अधिमित्र प्रशिक्षकांनी घ्यावीत, अशी अपेक्षा आहे. शिक्षक, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे किशोरवयीन मुलांबरोबर काम करण्याचा अनुभव तसेच त्यांच्या भावविश्वाविषयी जिव्हाळा असलेल्या व्यक्तींनी या प्रशिक्षणासाठी यावे, अशी कल्पना आहे.

‘संयम’च्या प्रमुख समन्वयक शमांगी देशपांडे म्हणाल्या, व्यसनाधीनतेला बळी पडणाऱ्या किशोरवयीन मुलांची वाढती संख्या हा भारताच्या प्रगतीतील अडथळा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी मन की बात मधून सूचित करतात. व्यसनाधीन किशोरवयीन मुले हा खरोखरीच समाजाच्या चिंतेचा विषय ठरत आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी गांभीर्याने काम होणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून ‘संयम’ प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. तीन दिवसांच्या प्रशिक्षणातून मुलांमध्ये होणारे मनोशारीरिक बदल, स्व-प्रतिमा, लैंगिक शोषण आणि यांचा व्यसनाधीनतेशी असलेला संबंध याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. विशेषत: महापालिकेच्या शाळांतील शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन त्या शाळांमध्ये येणाऱ्या किशोरवयीन मुलांपर्यंत हा विषय पोहोचवावा, असे वाटते.

प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी

या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी ७८२१०७२३४६ या क्रमांकावर किंवा saiyam.jpip@gmail.com या इमेलवर संपर्क साधता येईल. प्रशिक्षण घेण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात हे प्रशिक्षण केवळ पुणे शहरातील व्यक्तींसाठी आहे. सरकारी आणि पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी या प्रशिक्षणात सहभाग घेऊन हा विषय सर्वदूर किशोरवयीन मुलांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 1:47 am

Web Title: moderation to prevent adolescent addiction abn 97
Next Stories
1 ‘डेक्कन क्वीन’चे रूपडे पालटणार!
2 राज्यात विद्यापीठांमधील ६५९ प्राध्यापक पदांची भरती 
3 दिवसा वेटर रात्री दुचाकी चोर, आरोपी मुद्देमालासह अटकेत
Just Now!
X