News Flash

भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत प्रथमच ऑनलाइन अध्यापन

प्राचीन विद्येच्या अभ्यासासाठी आधुनिक माध्यम

प्राचीन विद्येच्या अभ्यासासाठी आधुनिक माध्यम

पुणे : प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील संशोधनासाठी जगभरात नावाजलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने प्राचीन विद्येच्या अभ्यासासाठी प्रथमच आधुनिक माध्यमाचा वापर केला आहे. ऑनलाइन अध्यापनाच्या माध्यमातून १५ ते ७५ वर्षे वयोगटातील विद्यार्थी भारताच्या ऐतिहासिक वारशाची ओळख करून घेत आहेत.

भांडारकर संस्थेने ‘हेरिटेज इंडिया’ आणि ‘न्यानसा’ या संस्थांच्या सहकार्याने ‘ओळख भारताच्या ऐतिहासिक वारशाची’ हा ऑनलाइन अभ्यासक्रम २६ एप्रिलपासून सुरू केला. यामध्ये दररोज सायंकाळी सात ते आठ या वेळात ‘गुगल-मिट’द्वारे ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी ज्ञान संपादन करतात. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या व्याख्यानाने अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. या अभ्यासक्रमात वेद, व्याकरण, वनस्पतिशास्त्र, संस्कृती, भाषा, प्राचीन खाद्य संस्कृती अशा विविध पैलूंवर डॉ. प्रदीप गोखले, डॉ. सुचेता परांजपे, डॉ. श्रीनंद बापट, डॉ. प्रदीप आपटे, डॉ. मंजिरी भालेराव, डॉ. विजया देशपांडे, डॉ. सचिन पुणेकर, डॉ. अमृता नातू, डॉ. अंबरीश खरे, सुधीर वैशंपायन, डॉ. श्रीकांत कार्लेकर, डॉ. गौरी बेडेकर यांची व्याख्याने झाली, अशी माहिती संस्थेचे मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन यांनी दिली.

‘ओळख भारताच्या ऐतिहासिक वारशाची’ या अभ्यासक्रमाला दोनशे जणांनी प्रतिसाद दिला. अनेकांच्या मागणीनुसार या अभ्यासक्रमाची दुसरी तुकडी रविवारपासून (१० मे) सुरू करण्यात आली आहे. देशाच्या विविध भागातील विद्यार्थ्यांसह अमेरिका, कॅनडा, स्पेन आणि कोरिया येथूनही अभ्यासक या अभ्यासक्रमात सहभागी झाले आहेत. व्याख्यान झाल्यानंतर सहभागी विद्यार्थी ‘चॅट’द्वारे वक्तयाला प्रश्न विचारू शकतात, असे वैशंपायन यांनी सांगितले.

‘ओळख भारताच्या ऐतिहासिक वारशाची’ हा अभ्यासक्रम नियमित स्वरूपाचा घेण्यात येणार होता. पण, करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फायदा या अभ्यासक्रमाला झाला.

– सुधीर वैशंपायन, मानद सचिव, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2020 1:16 am

Web Title: modern medium for the study of ancient study by the bhandarkar oriental research institute zws 70
Next Stories
1 प्रयोगशील ‘रॅप’ गाण्यांतून ‘करोना’विषयी जनजागृती
2 उन्हाचा चटका कायम
3 मद्यपींकडून महिला पोलीस हवालदाराला धक्काबुक्की
Just Now!
X