योगेंद्र यादव यांची टीका

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, लोकपाल, कॅग अशा सर्व संस्थांवर सरकार नियंत्रण ठेवू पाहात आहे. न्यायपालिका, नोकरशाही आणि माध्यमे खिशात घालण्याचे प्रकारही सुरू आहेत. आणीबाणीनंतरचा लोकशाहीवरील हा सर्वात मोठा हल्ला आहे, अशी टीका राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी येथे सोमवारी केली.

शिवजयंतीनिमित्ताने एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या वतीने ‘राष्ट्रनिर्माण आणि आजचा युगधर्म’ या विषयावर योगेंद्र यादव यांनी तरूणाईशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ही टीका केली. एस. एम. जोशी सोशलिस्ट फौउंडेशनचे प्रा. सुभाष वारे या वेळी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम याच्या निषेधाचा ठरावही या वेळी करण्यात आला.

यादव म्हणाले,‘न्यायपालिका, नोकरशाही, माध्यमे असे विविध स्तंभ खिशात घालण्याचे काम सध्या सुरू आहे. न्यायपालिकेचा गळा घोटला जात असल्याचा असंतोषच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांकडून व्यक्त झाला. दिल्लीत तत्कालीन सरकाराच्या आशीर्वादाने शीख हत्याकांड झाले. गुजरातमध्ये सन २००२ मध्ये दंगल झाली. हा देशाच्या विविधतेवर हल्ला करण्याचा प्रकार होता. आज सरकारच्या बाजूने बातम्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानंतरही आम्ही भ्रष्टाचार करीत नाही, असा दावा सरकार करत आहे. शासकीय यंत्रणांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रकार सुरु असतानाही न्यायमूर्ती लोया प्रकरण, राफेल, पीएनबी अशी प्रकरणे बाहेर येत आहेत. देशाला धार्मिकतेवर आधारित हिंदूंचे पाकिस्तान करण्याचा प्रकारही सुरू आहे. त्यामुळे राजनीती हीच समाजसेवेचे सर्वश्रेष्ठ स्वरूप मानून त्या मार्गाने आपण देशाला वाचवू शकतो. त्यासाठी चांगल्या लोकांनी पुढे आले पाहिजे.’