वर्षांनुवर्षे रखडलेले देशातील अनेक महत्त्वाचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दोन वर्षांत मार्गी लावल्याचे सांगत सरकारने पायाभूत सुविधांची उभारणी व रोजगार निर्मितीसाठी प्राधान्यक्रम दिल्याची माहिती भाजपचे खासदार अमर साबळे व शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शहर भाजपच्या वतीने सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची तसेच योजनांची माहिती देण्यात आली.

शेतक ऱ्यांचे सबलीकरण, जनधन योजना, डिजिटल इंडिया, ग्रामीण रस्ते, स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन, वन रँक वन पेन्शन योजना, ७७०० गावांना वीजपुरवठा, चार लाख स्वच्छतागृहे, आरोग्य कवच, काळ्या पैशाच्या विरोधात कारवाई, जागतिक गुंतवणूक, न्यायालयीन व्यवस्थेतील सुधारणा, खाण क्षेत्रातील पारदर्शकता, नाविक भारताची स्वत:ची जीपीएस व्यवस्था, पंतप्रधानांचे कौशल्य विकास मिशन, बांगलादेशासोबतचा जमीन सीमा करार आदी विविध निर्णयांची माहिती त्यांनी दिली.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीच्या फाइल्स उघड केल्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या पत्रकार परिषदेत उमा खापरे, शैला मोळक, माउली थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यकारिणीच्या वादावर मौन

िपपरी शहर भाजपमधील कार्यकारिणीवरून पक्षात जोरदार धुसफूस सुरू आहे. यासंदर्भात, पत्रकारांनी विचारणा केली असता, खासदार अमर साबळे व आमदार लक्ष्मण जगताप यांनी मौन बाळगले. या विषयासाठी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊ, असे सांगत त्यांनी या विषयाला बगल दिली.