पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी निवडणुकांच्या काळात एकमेकांवर कडाडून टीका केल्याच्या गोष्टीला इनमीन तीन-चार महिने होता न होतात तोच मोदी हे शनिवारी पवारांच्या बारामतीला भेट द्यायला आले. यजमान पवारांनी मोदी यांचे तोंड भरून कौतुक केले, मोदींनीही त्याची परतफेड केली.. दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला.. मात्र, त्या वेळी व्यासपीठावर बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि14Modi-Pawar1 माजी मुख्यमंत्री अजित पवार यांना या व्हॅलेंटाइनचा नेमका अर्थ न उमगल्याने ते गोंधळलेले दिसले.
निमित्त होते- बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठानच्या भाजीपाला गुणवत्ता केंद्राच्या उद्घाटनाचे! त्यासाठी पंतप्रधान बारामती येथे आले होते. मुहूर्त होता- १४ फेब्रुवारीचा अर्थात ‘व्हॅलेंटाइन डे’ चा. अवघ्या चार महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बारामती येथे मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख ‘नॅचरली करप्ट पार्टी’ असा करून काका-पुतण्याच्या गुलामगिरीतून बारामतीकरांची सुटका व्हावी असे आवाहन केले होते. तर, शरद पवार यांनी ‘अध्र्या चड्डीवाल्यांच्या हातामध्ये सत्ता देऊ नका’, अशा शब्दांत भाजपवर टीका केली होती. या घटना ताज्या असतानाच या नेत्यांच्या मनोमीलनामध्ये चार वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळाला. ‘शरदरावजी’ असा उल्लेख करीत मोदी यांनी पवारांवर स्तुतिसुमने उधळली. ‘विवाद आणि संवाद हे लोकशाहीचे सौंदर्य आहे,’ अशा शब्दांत मोदी यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले.
‘बारामतीच्या शेतक ऱ्यांमध्ये मती आहे आणि गती आहे. जिथे मती आणि गती असते तिथे प्रगती असते,’ अशी मराठीमध्ये दोन वाक्ये उच्चारत नरेंद्र मोदी यांनी बारामतीकरांच्या टाळ्या मिळवल्या. ‘‘माझे पत्रकार मित्र आमची यापूर्वीचा विधाने तपासून पाहतील. शरदराव आणि मी, आम्ही वेगळ्या पक्षांचे आणि विचारधारांचे आहोत. पण, आमच्यासाठी पक्षापेक्षा देश महत्त्वाचा आहे. राजनीतीपेक्षाही राष्ट्रनीती महत्त्वाची असते. विरोधी पक्षातील नेत्याला भेटल्याचे आश्चर्य का व्यक्त होते. ही भेट सहज आणि सरळ झाली पाहिजे. विकासासाठी विचारविनिमय आवश्यक असतो. सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षनेत्याची तर ही विशेष जबाबदारी असते. त्या भूमिकेला मी महत्त्व देतो,’’ असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
‘‘मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना पवार यांनी आणंदला भेट दिली होती. ही भेट केवळ विकासाची कामे दाखविण्यासाठी नव्हती. तर, शरदराव यांच्याकडून मी काही शिकावे यासाठी होती. दर महिन्याला किमान दोन-तीनदा आमच्यात चर्चा होत असते. राज्य सरकार चालविणे कठीण असते. केंद्राकडून अधिकाधिक मदत मिळविण्यासाठी पवारांनी सहकार्य केले,’’ असे सांगून मोदी यांनी, बारामतीच्या विकासासाठी पवारांनी दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक केले. मात्र, येथून बाहेर पडल्यानंतर आम्ही एकमेकांवर टीका करू शकतो, हेही स्पष्ट केले.
त्यापूर्वी पवार यांनीही भाषणात मोदी यांचे भरभरून कौतुक केले. ‘‘मोदी यांनी मला आणंद येथे बोलावून पशु आणि दुग्धसंवर्धन क्षेत्रात केलेली प्रगती दाखविली होती. आज बारामतीला पंतप्रधान आले आणि येथील शेतकऱ्यांनी केलेली प्रगती मला त्यांना दाखविता आली याचा आनंद आहे. ऊसउत्पादक आणि दुग्धउत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावा यासाठी राज्य सरकार जी पावले उचलत आहे त्याला केंद्राचे पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राजकारण दोन दिवसांचे असते. उर्वरित ३६३ दिवस विकासासाठी काम करायचे असते. त्यामुळे या विकासकामामध्ये आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू,’’ असे पवार म्हणाले.