‘मी कोण आहे, तुला माहीत नाही का?’ असा प्रश्न करून मोठेपणा मिरवीत थेट वरिष्ठांकडे तक्रार करणाऱ्या अनेकांचा अनुभव पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावरील कर्मचाऱ्यांना रोजचा असताना एका अभिनेत्यातील खऱ्या मोठेपणाचा निराळा अनुभव गुरुवारी या कर्मचाऱ्यांनी घेतला. हा अभिनेता प्रवेशद्वारावर आला व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार अत्यंत नम्रपणे तो मेटल डिटेक्टरमधून गेला. सर्व नियमांचे पालन करीत नोंदवहीमध्ये स्वत:चे नाव व येण्याचे कारणही नोंदविले. नोंदविलेले हे नाव होते मोहन आगाशे..!
सुरक्षेच्या दृष्टीने सध्या पोलीस आयुक्तालयात येणाऱ्या प्रत्येकाला प्रवेशद्वारावरच आडवून चौकशी केली जाते. तेथून प्रत्येकाला मेटल डिटेक्टरमधून जावे लागते. त्याचप्रमाणे नोंदवहीत नाव व येण्याचे कारणही नोंदवावे लागते. प्रत्येकाकडील बॅग किंवा पिशव्यांचीही या ठिकाणी तपासणी केली जाते. नागरिकांची वाहने प्रवेशद्वारातून आत घेतली जात नाहीत. सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या या उपाययोजनांना अनेकांचे सहकार्य मिळते. मात्र, काही काहींच्या बाबतीत हा अपवादही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे खासदार, आमदार, नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी थेट मोटारीत बसूनच आयुक्तालयात प्रवेश करतात.
एखाद्या ‘माननीया’ला प्रवेशद्वारावर असलेल्या कर्मचाऱ्याने ओळखले नाही, तर मात्र मोठा गहजबच होतो. ‘मला ओळखत नाही का’, ‘थांब, तुझ्याकडे बघतोच’ अशा संवादापर्यंत प्रसंग येतो. अनेक जण आत कार्यालयामध्ये बसलेल्या वरिष्ठांना दूरध्वनी करून तक्रार करतात. त्यात शेवटी कर्मचाऱ्यांनाच वरिष्ठांची बोलणी खावी लागतात. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या निमित्ताने प्रवेशद्वारावरील कर्मचाऱ्यांना गुरुवारी मात्र वेगळाच अनुभव मिळाला.
आगाशे हे एका कामानिमित्ताने पोलीस आयुक्तालयात आले होते. मोटारीतून उतरल्यानंतर प्रवेशद्वारावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना मेटल डिटेक्टरमधून जाऊन नोदवहीत नोंद करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर जराही आढेवेढे न घेता त्यांना आत जाण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचे पालन केले. काम संपवून परत जाताना या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची आवर्जून भेट घेतली व सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.