सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन ; छात्र संसदेमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद
‘आरक्षण हे गरजेचे असून ते प्रामाणिकपणे राबवणेही गरजेचे आहे. याबाबत संविधानाशी कोणतेही मतभेद नाहीत. मात्र अंमलबजावणी प्रामाणिक हवी. संविधानाचा हवा तसा अर्थ लावणे योग्य नाही,’ असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी येथे केले. भारतीय छात्र संसदेमध्ये विद्यार्थ्यांनी आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
माईर्स एमआयटीने आयोजित केलेल्या भारतीय छात्र संसदेमध्ये भागवत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘संस्कृती, संविधानाच्या माध्यमातून एकात्मता’ या विषयावर बोलताना भागवत म्हणाले, ‘संविधान तयार झाले, तेव्हा ते सर्व संमतीने तयार झाले असले, तरी त्यात काळानुसार बदल करण्याची वेळ आली आहे. भारतीय संविधान हे सर्वाना सामावून घेणारे आहे.
पाकिस्तानचे संविधानही सर्वसमावेशक असावे असे महंमद जिनांना अपेक्षित असावे. मात्र आता ते एकसंप्रदायावर आधारित झाले आहे. त्यांच्याकडे सर्वसमावेशकता, सहिष्णुता नाही. मात्र भारतीय संस्कृतीने सर्वाना एकत्र बांधले आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती हा संविधानाचा आत्मा आहे.

‘राममंदिर बनलेच पाहिजे’
राम मंदिर बांधून गरिबांना अन्न मिळणार का? असा प्रश्न या कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थ्यांने भागवत यांना केला. त्या वेळी ‘आता राममंदिर उभारलेले नाही, तेव्हा कोठे कुणाला काय मिळाले आहे?’ असा प्रतिप्रश्न करून भागवत म्हणाले, ‘भारतीय संस्कृतीचे आदर्श पुरुष असलेल्या भगवान रामांचे ते जन्मठिकाण आहे. तेथे मंदिर झालेच पाहिजे.’